(फोटो सौजन्य: Pinterest)
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवात गणपती बाप्पा सोबत गौरीचे आगमनही होते. गौरी ही गणपतीची आई आपल्या मुलाला परत नेण्यासाठी तीचे आगमन झाल्याचे सांगितले जाते. गौरीचे आगमन हे घरातील ऐश्वर्य, सुख-समृद्धी व मंगलमय वातावरणाचे प्रतीक मानले जाते. जसा गणेशाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो अगदी त्याचप्रमाणे गौरी पूजनाच्या दिवशी देवीलाही निरनिराळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. नैवेद्याचे हे ताट केवळ नैवेद्य नसून परंपरा, संस्कृती आणि भक्तीभावाचा संगम असतो.
सर्वप्रथम ताटात वरण-भात, पोळी आणि भाजी हे नेहमीचे पण पवित्र मानले जाणारे पदार्थ ठेवले जातात. वरण-भात साधेपणाचे, तर पोळी-भाजी परिश्रमाचे प्रतीक मानले जाते. त्याचसोबत कडधान्यांची आमटी, कुरकुरीत भजी किंवा पकोडेही ताटात ठेवले जातात. गोडधोडाशिवाय गौरी पूजनाचे ताट अपूर्णच मानले जाते. मोदक, पुरणपोळी, लाडू, खीर, श्रीखंड किंवा बासुंदी असे गोड पदार्थ नैवेद्यात खास करून ठेवले जातात. गणपतीप्रमाणेच गौरीलाही मोदक प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात या दिवशी उकडीचे किंवा तळलेले मोदक बनवले जातात.
गौरी पूजनासाठी पाच प्रकारच्या भाज्या ठेवण्याची प्रथा आहे. भोपळा, वांगी, कारले, सुरण आणि घोसाळे या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. भाज्यांच्या या विविधतेतून निसर्गाची संपन्नता व्यक्त होते. याशिवाय ताटात फळे ठेवली जातात. डाळिंब, द्राक्षे, केळी, पेरू, सफरचंद अशी हंगामी फळे ताट आकर्षक करतात. फळांमुळे ताट अधिक समृद्ध आणि रंगतदार दिसते. खोबरे, ऊस आणि सुपारी हेही ताटातील महत्त्वाचे घटक आहेत. खोबरे शुद्धतेचे, ऊस गोडीचे, तर सुपारी मंगलकार्याचे प्रतीक मानली जाते.
गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ, पारंपरिक पदार्थ वाढवतील सणांची शोभा
ताटात सुगंधी फुलेही ठेवली जातात. मोगरा, जाई-जुई, कमळ यांसारखी फुले आणि आंब्याची पाने, तुळशीची पाने या नैसर्गिक घटकांनी ताटाचे सौंदर्य आणि पवित्रता अधिक खुलते. गौरी पूजनाचे ताट हे फक्त पदार्थांचे मिश्रण नसून ते आपल्या श्रद्धा, संस्कार आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक आहे. प्रत्येक पदार्थामागे एक धार्मिक व सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. असे मानले जाते की गौरीला हे पदार्थ अर्पण केल्याने घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदते. त्यामुळे गौरी पूजनाच्या ताटात वरण-भात, पोळी-भाजी, गोडधोड, पंचभाज्या, फळे, खोबरे, सुपारी, ऊस व फुले हे सर्व घटक आवर्जून ठेवलेच पाहिजेत. हे ताट देवीचे पूजन अधिक मंगलमय आणि पूर्णत्व देणारे ठरते.
गौरी पूजा म्हणजे काय?
शक्ती आणि वैवाहिक प्रेमाचे प्रतीक असलेल्या देवी पार्वती (गौरी) यांना समर्पित हा हिंदू सण विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला साजरा करतात. देवी गौरीची या सणात मनोभावनेने पूजा केली जाते.
गौरी पूजेचे महत्त्व काय?
हा सण भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक आहे. हा सण सुसंवाद वाढवतो, आंतरिक शांती वाढवतो आणि समृद्धी आणि संरक्षणाचे आशीर्वाद देतो. स्त्री शक्ती आणि दैवी शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.