फोटो सौैजन्य - Social Media
उन्हाळ्याच्या दिवसांत सततचा घाम, धूळ-माती आणि कडक सूर्यप्रकाश यामुळे चेहरा निस्तेज, कोरडा आणि थकलेला दिसू लागतो. अनेकदा त्वचेवरून नैसर्गिक चमक हरवते आणि त्वचा काळसर वाटते. मात्र, यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी जर काही खास गोष्टींचा नियमित वापर केला, तर त्वचेला परत उजळपणा आणि ताजेपणा मिळवून देता येतो.
सर्वप्रथम एलोवेरा जेल वापरणे हे एक उत्तम घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या आणि शुद्ध एलोवेरा जेल चेहऱ्यावर व मानेला लावून सौम्य मसाज करा. हे जेल संपूर्ण रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या आणि सकाळी ताजं पाण्याने धुऊन टाका. काहीच दिवसांत त्वचा हायड्रेटेड वाटू लागेल आणि नैसर्गिक चमक परत येईल. दुसरा उपाय म्हणजे गुलाब जल आणि ग्लिसरीन यांचे मिश्रण. हे त्वचेला ओलावा पुरवते आणि ती मऊ, स्वच्छ ठेवते. एक छोट्या बाटलीत समप्रमाणात गुलाब जल आणि ग्लिसरीन मिसळा. रात्री झोपण्याआधी काही थेंब चेहऱ्यावर व मानेला लावून हलक्या हाताने मसाज करा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ग्लिसरीनचं प्रमाण थोडं कमी ठेवावं.
तिसरा आणि अत्यंत उपयुक्त उपाय म्हणजे बदाम तेल. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचेला पोषण देते, डार्क सर्कल्स आणि पिग्मेंटेशन कमी करते. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून बदाम तेलाच्या दोन-तीन थेंबांनी चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या खाली सौम्य मसाज करा आणि रात्रीभर तसेच ठेवून द्या. हे उपाय वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चेहरा स्वच्छ करूनच उपाय सुरू करा, नियमितपणे हे उपाय करत राहा, आणि दिवसा बाहेर जाताना नेहमी दर्जेदार सनस्क्रीन लावा. या सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी उन्हाळ्यातही तुमची त्वचा ताजीतवानी, मऊ आणि उजळ राहील.