फोटो सौजन्य - Social Media
भीमाशंकर म्हणजे स्वतः भगवान शंकराचे स्थान आहे. येथे जाण्याचे दोन मार्ग आहे, एक तर रस्त्याने जाता किंवा ट्रेकिंग करत डोंगर पार करून भीमाशंकरला पोहचता येते. मयूर, चेतन आणि नारायण नावाचे तीन मित्र, डोंगर पार करत, ४ ते ५ तासांचा ट्रेक करत भीमाशंकरच्या डोंगरात पोहचण्याचे ठरवतात. तसेही ट्रेकर मंडळी जरा आवली होती. त्यामुळे त्यांनी रात्रीचे १ वाजताच ट्रेक करण्यास सुरुवात केली. ट्रेकच्या पायथाच्या गावापासून त्यांनी चालायला सुरुवात केली. तीन वाजेपर्यंत त्यांनी आर्धा प्रवास पार केला होता. तेव्हा त्यांना फार काही जाणवलं नाही.
परंतु, त्यांनतर अचानक शांतता वाढली. मयूरच्या पायाखाली एक कॅन आला. त्या कोल्ड ड्रिंकच्या कॅनला त्याने लाटेने दूर फेकला. नंतर ते तिघे त्याच वाटेने पुढे शांत चालत होते. त्या वाटेत दिवसाही फारसा उजेड नसतो तर रात्री किती अंधार असेल याचा विचार करा. १५ मिनिटे पुढे जात, त्या तिघांच्या पायाखाली तसाच सारखा कोल्ड ड्रिंकचा कॅन आला. तिघांच्या चेहऱ्यावर आट्या आल्या पण त्यांनी ते दुर्लक्षित केले आणि पुढे जाऊ लागले. पुन्हा परत १५ मिनिटांनी तोच कॅन, तीच झाडं! तोच परिसर! तेव्हा यांनी रास्ता बदल्यांचा निर्णय घेतला.
मयूरने पुढाकार घेतला आणि मुख्य पायवाट सोडून उजव्या बाजूच्या एका अरुंद वाटेने जायला सुरुवात केली. “कदाचित पायवाटेवर काहीतरी तांत्रिक चूक होत असेल, आपण झाडांच्या खुणा बघत वर चढूया,” चेतन पुटपुटला. नारायणने आपला टॉर्च गरगर फिरवला, पण बॅटरीचा प्रकाश जणू त्या काळोखात शोषला जात होता.
दहा मिनिटं चढण चढल्यावर त्यांना वाटलं की आता आपण उंचीवर आलो आहोत. पण अचानक मयूर थांबला. त्याचा पाय कशावर तरी आदळला होता. खाली वाकून पाहिलं तर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला… तोच निळा कोल्ड ड्रिंकचा कॅन तिथे पडला होता! मयूरने मघाशी ज्या वेगाने त्याला लाथ मारली होती, अगदी त्याच कोनात तो तिथे स्थिरावला होता.
आता हे स्पष्ट होतं की हा योगायोग नाही. हे निसर्गाचं चक्र नव्हतं, तर हा ‘चकवा’ होता.
“आपण एकाच जागी गोल फिरतोय, पण कसं? आपण तर चढण चढलो ना?” नारायणचा आवाज भीतीने थरथरू लागला. तितक्यात आजूबाजूच्या झाडांमधून एक विचित्र आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी वाळलेला पालापाचोळा तुडवत त्यांच्याभोवती फेर धरत होतं. त्यांनी टॉर्च फिरवून पाहिला, पण तिथे फक्त दाट झाडी आणि धुकं होतं.
अचानक चेतनला जाणवलं की त्यांच्यासोबत चालणाऱ्या पावलांचा आवाज ‘तीन’ नाही तर ‘चार’ आहेत. ते थांबले की तो चौथा आवाजही थांबायचा. “कोणी आहे का?” मयूरने जोरात ओरडून विचारलं, पण उत्तरादाखल फक्त डोंगराचा प्रतिध्वनी परत आला. नारायणला त्याच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. “मित्रांनो, शांत व्हा! हा चकवा आहे. आपण जितके घाबरू, तितके यात अडकत जाऊ.” त्याने सुचवलं की आपण आपले कपडे उलटे करून घालूया आणि पुन्हा एकदा देवाचं नाव घेऊया. त्यांनी आपले शर्ट उलटे घातले, डोळे मिटून भीमाशंकरचं स्मरण केलं आणि ठरवलं की आता दिशेचा विचार न करता फक्त सरळ चालायचं, मागे वळून बघायचं नाही. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले. मयूरने त्या निळ्या कॅनकडे दुर्लक्ष केलं.
सुमारे वीस मिनिटं ते मूकपणे चालत राहिले. हवेतला तो जडपणा हळूहळू कमी होऊ लागला. अचानक, लांबून एका मंदिरातल्या घंटेचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने ते धावत सुटले. काही वेळातच ते एका जुन्या पडक्या मंदिरापाशी पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांना जाणवलं की तो ‘चकवा’ सुटला आहे. पहाटेचे पाच वाजले होते. दूरवर भीमाशंकर मंदिराचे शिखर धुक्यातून डोकावत होते. त्या रात्रीच्या थराराने त्यांना एक गोष्ट शिकवली होती. डोंगर-दऱ्यांत स्वतःच्या हिंमतीवर चालणं चांगलं असतं, पण तिथल्या अदृश्य शक्तींचा आदर राखणं त्याहूनही महत्त्वाचं असतं.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर
हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






