राघव विक्रोळीला राजपुरी अपार्टमेंटमध्ये राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता. सकाळपासून संध्यकाळपर्यंत ऑफिसमध्ये राबून रात्री जेवल्यानंतर चालण्यासाठी दररोज बाहेर पडत असायचा. त्याच्या बिल्डिंगपासून Easten Express हायवे तसे फार दूर नाही. अगदी दहा मिनिटे चालत तो हायवेपर्यंत पोह्चायचा आणि नंतर माघारी घराकडे परतायचा पण त्या रात्री तो ऑफिसवरून घरी उशिरा परतला. रात्रीचे दहा वाजता तो घरी आला. जेवून घेईपर्यंत रात्रीचे साडे ११ झाले होते. फार उशीरही झाला होता पण दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी होती. म्हणून लहान भावाला सोबत घेऊन तो शतपावली करायला निघाला.
दोघे भाऊ हसत खेळत हायवेकडे आले. गप्पा गोष्टी सुरूच होत्या. हायवेवर गाड्या सुसाट धावत होत्या. आकाशात चंद्र नव्हता कारण पितृ अमावास्येची ती मध्य रात्र होती. Eastern Express हायवेच्या किनारी चालत असताना राघवला मागून एक आवाज आला. “काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना! मला भीती वाटतेय.” एक चिमुरडी त्याला सतत सांगत होती. राघव विचारात पडला. मध्यरात्रीचे १२ वाजत आले आहे. इतक्या रात्री ही १०-१२ वर्षांची चिमुरडी इतक्या मोठ्या हायवेच्या शेजारी काय करते? हिचे आई वडील इतके कसे बेफिकीर!
राघव त्या मुलीच्या जवळ गेला. तिच्यासमोर घुडघ्यावर बसला. तिचे हात पकडून तिला म्हणाला, “बेटा, इतक्या रात्री इथे काय करतेस? आई बाबा कुठे आहेत?” चिमुरडी त्याच्या या प्रश्नांना काहीच उत्तर देत नव्हती. ती सतत एकच वाक्य पुनरुच्चारित होती की,”काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना! मला भीती वाटतेय.” राघव क्षणभर विचारात पडतो पण इतक्या रात्री ही चिमुरडी जाणार कुठे? त्यामुळे तिला तिच्या घरी सोडण्याचे ठरवतो.
राघव त्या मुलीला तिच्या बिल्डिंगचे नाव विचारतो. ती उत्तर देते “राजहंस अपार्टमेंट”! हे नाव ऐकून त्याला नवल वाटते. कारण राघव अगदी जन्मापासून त्या एरियामध्ये राहतोय आणि तिथे या नावाची कोणतीच बिल्डिंग नाही आहे. तरी बहुदा असेल आपल्या नजरेस कधी आली नसेल या विचारात तो चिमुरडीच्या सोबत निघतो. चिमुरडी त्या दोन्ही भावांना सोबत घेऊन चालत असते पण तोंडातून एक शब्द काढत नाही. मगाशी रडक्या अवस्थेत असणारी चिमुरडी आता शांत दिसत आहे. चेहऱ्यावर भावच नाहीत.
पाहता-पाहता रहिवाशी वस्ती संपून जाते. सगळ्या बिल्डींग्स, सगळे अपार्टमेंट संपून जातात. गेल्या २० मिनिटांपासून ते चालत असतात. शेवटी एका जागेवर येऊन ती चिमुरडी थांबते. ज्या ठिकाणी ते तिघे थांबतात, तिथे आजूबाजूला कोणतीच मानवी वस्ती नसते. राघव त्या चिमुरडीला विचारतो. “बाळा, नक्की राहतेस कुठे तू?” ते विचारताना राघवाचे लक्ष त्या मुलीच्या पायाकडे जातात. मुलीचे पाय उलटे असतात. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू भाजलेल्या जखमा दिसू लागतात. ती मुलगी दूरच समोरच्या दिशेने हात दाखवते. जे पाहून त्या दोन्ही भावांच्या पायाखालची जमीन सरकते. तिथे स्मशानभूमी असते.
त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरच्या जखमा वाढत जातात. जणू ती काही आताच भाजली आहे किंवा मोठ्या विस्फोटातून काढलेला मृतदेहच जणू! दोघे भाऊ कसलाही विचार न करता, हायवेच्या दिशेने पळू लागतात. धावता धावता ते त्याच ठिकाणी येऊन पोहचतात, जिथे आधी ती चिमुरडी त्यांना भेटली होती. पण त्यांनी सुखाचा श्वास सोडला असतो, ते त्या ठिकाणाहून घराकडे जाण्यास निघतात. तर परत राघवच्या कानावर त्या चिमुरडीच्या आवाज पडतो. “”काका, मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा ना! मला भीती वाटतेय.”
राघव आणि त्याचा भाऊ, मागे वळून बिलकुल न बघता. घराच्या दिशेने धावत सुटतात. घरी जाऊन आईला घडलेला सगळा प्रकार सांगतात. पण त्या चिमुरडीने सांगितलेल्या बिल्डिंगचे नाव ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकते. आई त्या दोघांना सांगते, “राजहंस अपार्टमेंट” ही बिल्डिंग तर काही ५० वर्षांपूर्वी आपल्या विक्रोळीत होती. दुर्घटना म्हणजे या बिल्डिंगला भीषण आग लागली होती. ही आग इतकी प्रखर की बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे जणं यात मरून गेले. ज्या ठिकाणी आता स्मशानभूमी आहे, तिथेच आधी ही बिल्डिंग होती. आईचे ते बोल ऐकताच दोघे भाव भीतीने अक्षरशा वेडे होतात. त्या रात्रीनंतर राघव कधीच शतपावली करण्यासाठी रात्री बाहेर फिरकत नाही.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)