कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर कसे सांभाळावे (फोटो सौजन्य - iStock)
कोलेस्टेरॉलची समस्या सहसा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये असते किंवा ही समस्या केवळ जीवनशैलीच्या घटकांशी निगडित असते अशा गैरसमजांमुळे अनेक रुग्णांना आश्चर्याचा असाच धक्का बसतो. या विकाराच्या प्रचलनामध्ये वाढ होत आहे, विशेषत: तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे यावरून जागरूकता कमी असल्याचे दिसून येते. भारतात उच्च कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या ३१ टक्के एवढी लक्षणीय असल्याचे अलीकडेच एका अभ्यासात दिसून आले.
उच्च एलडीएलसीची कोणतीही लक्षणे जाणवत नाही; ते धमन्यांमध्ये जमा होऊ लागते आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करते, त्याची परिणती गंभीर स्वरूपाच्या हृदयविकारांमध्ये होते. अगदी काही महिने उशीर झाला तरी नंतरच्या टप्प्यात तीव्र उपचार देऊनही हे विकार पूर्णपणे बरे न होण्याचा धोका असतो. एलडीएलसी अधिक वाढल्यामुळे प्लाक तयार होण्याची प्रक्रिया जलद होते. विशेषत: अतिधोका असलेल्या व्यक्तींमध्ये, म्हणजेच मधुमेह, हायपरटेन्शन हे आजार असलेल्यांमध्ये किंवा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हे अधिक प्रकर्षाने आढळते.
काय सांगतात तज्ज्ञ
“मला कधीच आजारी असल्यासारखे वाटले नव्हते, त्यामुळे ही गोष्ट स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते,” रूग्ण राजीव मेहता यांनी सांगितले. “मला वाटायचे, कोलेस्टेरॉलची समस्या वयोवृद्ध लोकांना होते किंवा जे लोक रोगी दिसतात त्यांना जाणवते. माझ्या शरीरात हृदयविकार मूकपणे वाढत आहे, याची कल्पनाच नव्हती.”
मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या कार्डिअॅक सायन्सेस विभागाचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. अजित मेनन म्हणाले, “केवळ वयाची ५० वर्षे उलटल्यानंतरच कोलेस्टेरॉलची चिंता करण्याची गरज आहे हा समज कालबाह्य आहे आणि खरे तर घातक आहे. प्रत्यक्षात धमन्या मोठ्या प्रमाणात संकुचित होऊ लागलेले ४० वर्षांच्या आतील अनेक रुग्ण आमच्यापुढे नियमितपणे येतात. त्यांना कोणतेही लक्षण जाणवत नसते पण त्यांचे आरोग्य धोक्यात असते. भारतातील कोलेस्टेरॉल समस्येच्या वाढीमागे, निदानच न होणे हे प्रमुख कारण आहे.
कोणतीही लक्षणे जाणवत नसतानाही लिपिड प्रोफाइल्सच्या माध्यमातून नियमित तपासणी करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या सुरक्षित आणि परिणामकारक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. औषधे एकदा घेण्यास सुरुवात केल्यानंतर सातत्याने घेतली पाहिजेत. औषधे मधेच बंद करणे किंवा स्वत:हून डोस बदलणे यांमुळे उपचारांत झालेली प्रगती निरुपयोगी ठरते. आज आपल्याकडे उपचारांचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे सातत्याने नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक मानसिकता हे लक्ष्य समोर असले पाहिजे.”
काय आहेत कारणं
“इस्केमिक हृदयविकार किंवा ब्लॉकेज तयार होणे यांमागे अनेक कारणे असतात. आनुवांशिकता हे सर्वांत सबळ कारण आहे. या कारणाबाबत आपण फार काही करू शकत नाही. अडथळा निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी तसेच कोलेस्टेरॉल प्रकारांचे (व्हॅल्यूज) व्यवस्थापन करण्यासाठी आपण जीवनशैली, धूम्रपान, आहार, मद्यपान आदींबाबत बदल करू शकतो. कोलेस्टेरॉल प्रकारांमध्ये ‘वाईट कोलेस्टेरॉल’ किंवा एलडीएल अधिक घातक असते. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करणे हे आपल्या नियंत्रणात असते आणि आधीपासून अस्तित्वात असलेला कोरोनरी धमन्यांचा आजार बरा करण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी आपण ते नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,” असे डॉक्टर म्हणाले.
कोणते उपाय आहेत?
पारंपरिक पर्याय आवश्यक तो परिणाम साध्य करून देऊ शकत नसतील तर अधिक प्रगत उपचारपद्धती उपलब्ध आहेत. नियमित उपचारपद्धतींना प्रतिसाद मिळाला नाही, तर पीसीएसकेनाइन, सिर्ना उपचारपद्धती किंवा इनक्लिसायरन यांसारखे लक्ष्याधारित उपचार रुग्णांना अपेक्षित एलडीएलसी पातळी गाठून देण्यात मदत करण्यासाठी आशेचा किरण ठरत आहेत.
त्याच वेळी ‘चांगले कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखले जाणारे एचडीएल कोलेस्टेरॉल वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो, कारण हे कोलेस्टेरॉल रक्तप्रवाहातील अतिरिक्त एलडीएलसी बाहेर टाकते. यासाठी जीवनशैलीत अनेक बदल करणे आवश्यक असते, उदाहरणार्थ, बैठी जीवनशैली सोडणे किंवा विचारपूर्वक आहार घेणे. अर्थात आरोग्यपूर्ण जीवनशैली हा उपचारांना पर्याय नाही हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे.
नसांना ब्लॉक करणारे घाणेरडे कोलेस्ट्रॉल सहज बाहेर काढतील 5 पदार्थ, शरीर सडण्यापासून वाचेल
रूग्णाचा अनुभव
राजीव मेहता सांगतात, “मला प्रथम सगळे नैसर्गिकरित्या होऊ देण्याचा प्रयत्न करायचा होता. मला वाटले, मी योग्य आहार घेतला, अधिक व्यायाम केला तर कदाचित गोळ्या घेणे टाळू शकेन.” त्यांच्या प्रयत्नांमुळे एकंदर तंदुरुस्ती सुधारली तरी एलडीएलसीवर फारसा परिणाम झाला नाही.
एलडीएलला अपेक्षित श्रेणीत आणायचे असेल तर जीवनशैलीतील बदलांना उपचारांची जोड मिळणेही गरजेचे आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेतल्यास उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल परिणामकारकरित्या व्यवस्थापित होऊ शकते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती आहे यानुसार दर ३-६ महिन्यांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. उपचारांनी उच्च कोलेस्टेरॉलची समस्या दूर होत नाही; तर कोलेस्टेरॉल नियंत्रित होते. त्यामुळे त्यांचे सातत्याने पालन केले पाहिजे, कारण औषधे मधेच थांबवल्यास कोलेस्टेरॉलची स्थिती पूर्ववत होऊ शकते.
राजीव मेहता म्हणाले, “अखेरीस मला औषधे घेणे आवश्यक आहे हे मी स्वीकारले. आणि ती घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत माझे एलडीएलसी लक्षणीयरित्या कमी झाले. तेव्हाच मला वैद्यक उपचारांचे महत्व खऱ्या अर्थाने लक्षात आले.”