(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकालची धावपळ, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्याच्या सवयींमुळे अनेकांना पचनसंस्था, मूत्रपिंडाचे त्रास, शरीरात सूज, थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत. हे आजार लवकर लक्षात येत नाहीत आणि त्यांची योग्य वेळी काळजी घेतली नाही, तर ते गंभीर रुप धारण करतात. यावर उपाय म्हणून काही नैसर्गिक घटकांचा समावेश आहारात केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामध्येच सध्या डॉक्टरांनी सुचवलेले दोन उपाय फायदेशीर ठरत आहेत, हे दोन पदार्थ म्हणजे सॉकरक्रॉट आणि बडीशेप चहा.
सॉकरक्रॉट – नैसर्गिक डिटॉक्सिफायर
डॉ. गौरव थवानी यांच्या मते, सॉकरक्रॉट म्हणजे आंबवलेले कोबीचं लोणचं हे किडनीसाठी एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. तसेच, शरीरातील सूज कमी करते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. सॉकरक्रॉटमध्ये असणारे प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात.
किडनी हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचं अवयव असून, ते दररोज रक्त शुद्ध करण्याचं काम करतं, शरीरातील अपायकारक पदार्थ गाळून टाकतं, आणि पाण्याचं योग्य प्रमाण राखतं. अशा परिस्थितीत जर किडनीची कार्यक्षमता कमी होत असेल, तर सॉकरक्रॉटसारख्या अन्नपदार्थाचा नियमित आहारात समावेश केल्यास फायदा होतो. हे सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणात खाल्लं तरी चालतं.
बडीशेप चहा – शरीरासाठी थंडावा आणि पोषण
दुसरा एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे बडीशेप चहा. रात्री एक ग्लास पाण्यात १ चमचा बडीशेप भिजत ठेवावी. सकाळी तेच पाणी उकळून गाळून गरम गरम प्यावं. या चहामध्ये साखर, दूध किंवा चहा पत्ती घालण्याची आवश्यकता नाही. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतं, जे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करतं. पचनक्रिया सुधारण्यास, पोट साफ राहण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरते.
नैसर्गिक उपायांचा वापर करा
हे दोन्ही उपाय सहज उपलब्ध असलेल्या आणि शरीराला हानी न पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत. यांचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीराच्या अनेक कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते. मात्र, कोणताही नवीन उपाय सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामासोबत हे नैसर्गिक उपाय तुमचं आरोग्य टिकवण्यास नक्कीच मदत करू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.