फोटो सौजन्य - Social Media
झोप ही आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते, स्मरणशक्ती कमकुवत होते तसेच शरीराचे वजन वाढण्याची शक्यता असते. अनेक संशोधनांनुसार, अपुरी झोप ही कॅन्सर, डायबेटीस आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देते. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन’ (AASM) नुसार, प्रत्येक तीन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही. झोपेच्या अभावामुळे फक्त थकवा आणि आळस येत नाही, तर त्वचा, डोळे आणि नखं यांच्यावरही मोठा परिणाम होतो.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे लवकर आजारी पडण्याचा धोका वाढतो. संशोधकांच्या मते, झोप आणि प्रतिकारशक्ती यांच्यात थेट संबंध आहे. जर एखादी व्यक्ती आजारी असेल आणि योग्य झोप घेत नसेल, तर शरीराची जंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. ‘युरोपियन हार्ट जर्नल’ मध्ये प्रकाशित अहवालानुसार, जर एखादी व्यक्ती ५ तासांपेक्षा कमी झोप घेत असेल, तर त्याच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. अपुरी झोप घेतल्याने कोरोनरी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एका संशोधनात ३० ते ५० वयोगटातील लोकांच्या झोपेच्या सवयी आणि त्यांच्या त्वचेच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले. यात आढळले की कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या त्वचेवर अधिक सुरकुत्या, असमान टोन आणि त्वचेचा ढीलापन दिसून आला. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि मुरूम यांसारख्या समस्या होऊ शकतात. नीट झोप न घेतल्यास त्वचेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि लवकर वृद्धावस्थेचे लक्षणे दिसू लागतात.
अपुरी झोप घेतल्याने नखंही कमकुवत आणि ठिसूळ होतात. यामुळे कोलेजन उत्पादन कमी होते आणि नखांच्या तळाशी रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे नखं लवकर तुटण्याची शक्यता वाढते. पुरेशी झोप न घेतल्याने शरीराला नखांना योग्य पोषण देण्यास अडथळा येतो. निरोगी नखांसाठी आणि त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास मानसिक तणावही वाढतो आणि त्याचा संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे दररोज किमान ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.