नवजात बाळांना कावीळ का होते आणि कोणती तपासणी करावी
त्वचा आणि डोळे पिवळे पडणे ही लक्षणे असलेली कावीळ होणे ही नवजात अर्भकांच्या बाबतीत सामान्य बाब आहे. हा पिवळसरपणा लाल रक्तपेशींच्या विघटनाने तयार होणारा पिवळा रंगद्रव्य बिलीरुबिनच्या वाढीमुळे होतो. बिलीरुबिन तयार करणे आणि ते शरीरातून काढून टाकणे ही यकृताची सामान्य प्रक्रिया आहे परंतु नवजात अर्भकांत या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने तात्पुरत्या प्रमाणात त्याची रक्तप्रवाहात वाढ होते.
कावीळ काही आठवड्यात स्वतःहून बरी होते, अडचणी टाळण्यासाठी बिलीरुबिन पातळीवर लक्ष ठेवणे महत्वाचे असते. यासाठी न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरी येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत आणि याबाबत अधिक माहिती दिली आहे.
बिलीरुबिन चाचणी आवश्यक का आहे
नवजात अर्भकातील कावीळच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यामध्ये बिलीरुबिन चाचणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कावीळ होणे सामान्य आहे, पूर्ण वाढ झालेल्या 60% अर्भकांना कावीळ होते तर पूर्ण वाढ न होता जन्मलेल्या अर्भकांच्या बाबतीत हे प्रमाण अजून जास्त आहे. कावीळ सौम्य असेल तर फक्त लक्ष ठेवणे गरजेचे असते, बिलीरुबिनचे प्रमाण जास्त झाले आणि त्यावर उपचार झाले नाहीत तर ते धोकादायक ठरू शकते, परिणामी कर्निकटेरस सारखा विकार होऊ शकतो ज्यामध्ये बिलीरुबिनच्या विषारीपणामुळे मेंदूला हानी पोहोचते. कर्निकटेरसमुळे श्रवणशक्ती कमी होणे, दृष्टीदोष आणि वाढ खुंटणे यासह आजीवन न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. बिलीरुबिन चाचणी केल्याने अर्भकांतील कावीळ धोकादायक आहे का लक्षात येते आणि वेळेवर उपचार करणे शक्य होते.
बाळांच्या तब्बेतीविषयी अधिक माहिती मिळेल एका क्लिकवर
बिलीरुबिन चाचण्यांचे प्रकार
नवजात अर्भकातील बिलीरुबिन पातळी तपासण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. ट्रान्सक्यूटेनियस बिलीरुबिन (टीसीबी) नावाची नॉन-इव्हेजिव्ह पद्धत ज्यामध्ये बिलीरुबिन पातळीचा अंदाज घेण्यासाठी बाळाच्या त्वचेवर उपकरण ठेवले जाते. टीसीबी रीडिंगनुसार बिलीरुबिनचे प्रमाण जास्त असल्यास रक्त तपासणी केली जाऊ शकते. रक्त चाचणी, ज्याला सीरम बिलीरुबिन (टीएसबी) देखील म्हणतात, त्यामध्ये रक्तातील बिलीरुबिनचे एकदम अचूक प्रमाण समजते. या चाचणीमुळे बिलीरुबिन पातळी सुरक्षितपणे कमी करण्यासाठी बाळाला फोटोथेरपीसारख्या उपचारांची आवश्यकता आहे का याचा निर्णय डॉक्टर घेऊ शकतात.
कधी आणि किती वेळा चाचणी करावी
नवजात अर्भकांची कावीळ चाचणी जन्माला आल्यानंतर 24 तासात केली जाते. कावीळ होण्याचा धोका असलेली बालके- जसे की मुदतपूर्व प्रसूत झालेली बाळे, अशी बालके ज्यांच्या भावंडांना कावीळ होऊन गेली आहे, किंवा आईच्या रक्तगटाशी विसंगत रक्तगट असलेली बालके, यांच्या बाबत अधिक वारंवार चाचण्यांची आवश्यकता असू शकते. फॉलो-अप बिलीरुबिन चाचणी सहसा प्रसूतीनंतर 48 ते 72 तासांनंतर केली जाते, कारण वयाच्या 3 ते 5 दिवसांदरम्यान बिलीरुबिनची पातळी सर्वात जास्त असण्याची शक्यता असते.
बाळासाठी कोणता पदार्थ आहे संजीवनी जाणून घ्या एका क्लिकवर
लवकर निदान आणि उपचार
बिलीरुबिन पातळी जास्त असल्यास लवकर उपचार सुरू करून अडचणी टाळता येऊ शकतात. मध्यम स्वरूपाच्या काविळीसाठी सामान्य आणि प्रभावी उपचार म्हणजे फोटोथेरपी, ज्यामध्ये निळ्या रंगाच्या प्रकाशाचा वापर करून बाळाच्या त्वचेतील बिलीरुबिन विघटित केले जातात. काविळीची तीव्रता त्यापेक्षा जास्त असल्यास ब्लड एक्स्चेंज ट्रान्सफ्यूजन करणे आवश्यक असते. बिलीरुबिन टेस्ट मुळे डॉक्टर लवकर योग्य ते उपचार सुरू करू शकतात, जेणेकरून कावीळ वाढून आरोग्यास हानी करू शकत नाही आणि बाळ सुरक्षित राहते. वेळेवर बिलीरुबिन चाचणीद्वारे, डॉक्टर गंभीर काविळीच्या गंभीर प्रकरणांवर देखील योग्य उपचार करून ती सुरक्षितपणे सोडवली जातात याची खात्री देत नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात.