भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला गोकुळ जन्माष्टमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता. श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण अष्टमीचा उपवास करतात आणि भाविकांकडून श्रीकृष्णाची पूजा केली जाते.
यंदा १८ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहे. हा योग १८ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत वाढत राहणार असून तो सकाळी पावणेनऊपर्यंत असणार आहे. यानंतर ध्रुव योग सुरू होणार असून तो १९ ऑगस्ट रात्री ८.५९ वाजेपर्यंत चालणार आहे. अष्टमी तिथी १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.२० वाजता सुरू होणार असून त्याचदिवशी 10.59 ला समाप्त होणार आहे. यानंतर निशीथ पूजा 18 ऑगस्टच्या रात्री १२.०३ ते १२.४७ पर्यंत चालणार आहे. निशीथ पूजेचा एकूण कालावधी ४४ मिनिटांचा असणार आहे. पारण १९ऑगस्ट रोजी पहाटे५.५२ नंतर होणार आहे.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला होता. त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी हा योग तयार होत आहे. तर काहींच्या मते १९ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस अष्टमी तिथी असेल आणि सूर्योदयही याच तारखेला होईल. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पण धार्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला. त्यामुळे हा उत्सव १८ ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्राच्या मूहुर्तावर झाला होता. मात्र यावेळी १८ आणि १९ऑगस्ट या दोन्ही दिवशी रोहिणी नक्षत्राचा योग आलेला नाही. हिंदू कैलेंडरनुसार, १९ ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र रात्री उशिरा पर्यंत राहणार आहे. यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल.
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या आधी रात्री हलका आहार घ्यावा. विशेषतः जन्माष्टमीच्या दिवशी सूर्य, सोम, यम, काल, संधि, भूत, पवन दिवपति भूमी, आकाश, खेचर, अमर, ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोड करून बसावे. यानंतर विधिपूर्वक भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी, असंही ज्योतिषांनी सांगितलं आहे. प्रभूच्या जन्मानंतर लोक उपवास सोडतात. मध्यरात्रीनंतर पूजेला सुरुवात केली जाते. यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घातले जाते. परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून पाळण्यात बसवले जाते आणि भक्तिगीते गात त्याची पूजा केली जाते.