आता संपूर्ण गुडघा बदलाची गरज नाही (फोटो सौजन्य - iStock)
ऑस्टिओआर्थरायटिसचे निदान झालेल्या लोकांसाठी अंशतः गुडघे प्रत्यारोपण एक वरदान ठरू शकते. हा लेख ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांसाठी अंशतः गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे फायदे अधोरेखित करतो. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास ही शस्त्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. डॉ. श्रीसनत राव, अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपण सर्जन, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?
ऑस्टिओआर्थरायटिस ही एक वयाशी संबंधित समस्या आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. यामध्ये हाडांच्या टोकांवरील सांध्यातील कूर्चा/गादीची झीज होते. यामुळे सांधेदुखी, सांध्यांना सूज, सांध्यांची हालचाली कमी होणे आणि सांध्यांमध्ये विकृती येऊ शकते. गुडघे आणि नितंब हे ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सामान्यतः प्रभावित होणारे सांधे आहेत.
पुरुषांपेक्षा स्त्रियांना, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर, ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते. इतर जोखीम घटकांमध्ये लठ्ठपणा (जास्त वजनामुळे सांध्यांवर अतिरिक्त भार येणे), सांध्यांना झालेल्या दुखापती (आघातामुळे पूर्वी झालेले सांध्यांचे नुकसान ), अनुवंशिकता (कुटुंबात ऑस्टिओआर्थरायटिसचा वैद्यकीय इतिहास असल्यास कमी वयात हा आजार होऊ शकतो) आणि वारंवार येणारा ताण (सांध्यांवर वारंवार ताण येणे) यांचा समावेश आहे.
गुडघेदुखी आणि सांधेदुखी असल्यास करा हे घरगुती उपाय
कोणत्या अवस्था आहेत?
गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसच्या विविध अवस्था आहेत. ग्रेड ४ ही अंतिम अवस्था गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आढळून येते, रुग्णांना त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे वेळीच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे दोन प्रकार आहेत: संपूर्णगुडघा प्रत्यारोपण (टोटल नी रिप्लेसमेंट) आणि अंशतः गुडघे प्रत्यारोपण. अंशतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये संपूर्ण गुडघ्याचा सांधा बदलण्याची गरज भासत नाही. केवळ गुडघ्याचा आतील भाग किंवा खराब झालेला भाग बदलतो, ज्याचा वापर ८० टक्के रुग्णांमध्ये केला जातो, ज्यामुळे उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित होते आणि चांगले परिणाम मिळतात.
जगातील १० ते २० टक्के रुग्ण टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर फारसे खुश नसतात कारण त्यांना गुडघ्याची नैसर्गिक जाणीव राहिलेली नसते. अशा रुग्णांना केवळ आतील भागातच संधिवात असल्याचे आढळल्यास, आंशिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे अधिक फायदा होतो.
काय आहेत फायदे
अंशतः गुडघे प्रत्यारोपणाच्या फायद्यांमध्ये लहान चीर पाडणे, जलद बरे होणे, वेदनांचे प्रमाण कमी होणे, टाकेविरहित शस्त्रक्रिया, कमीत कमी रक्तस्राव आणि हाडांचे नुकसान, शस्त्रक्रियेनंतर २ आठवड्यांच्या आत कामावर परतणे यांचा समावेश आहे. अनेक रुग्ण शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी घरी परततात.
मात्र, प्रत्येकजण अंशतः गुडघे प्रत्यारोपणासाठी पात्र नसते. ही शस्त्रक्रिया सामान्यतः अशा रुग्णांसाठी योग्य आहे ज्यांच्या गुडघ्याचा संधिवात फक्त एकाच भागात मर्यादित आहे आणि इतर भागांमध्ये कमीत कमी नुकसान झाले आहे. आम्ही रुग्णाला आमच्या मार्गदर्शनाखाली विशेष एक्स-रे करून घेण्याचा सल्ला देतो आणि त्या निष्कर्षांवर आधारित, आम्ही रुग्णाला गुडघे प्रत्यारोपणाच्या त्यांच्या पात्रतेबद्दल समजावून सांगतो. सध्याचे इम्प्लांट व्हिटॅमिन ई-कोटेड असल्याने आणि इम्प्लांटच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे, इम्प्लांटच्या टिकाऊपणामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
गुडघेदुखी होईल आता छुमंतर एकच पदार्थ पाण्यात उकळून प्या, वेदनेला म्हणा बाय
कशी घ्यावी काळजी
शस्त्रक्रियेनंतर, अंशतः गुडघे प्रत्यारोपणाच्या रुग्णाला गुडघ्याचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी घरच्या घरी व्यायामाचा सल्ला दिला जातो. हे रुग्ण पोहणे, सायकलिंग आणि चालणे यांसारख्या कमी-प्रभावाच्या ॲक्टिव्हिटीजमध्येही सहभागी होऊ शकतात. अंशतः गुडघे प्रत्यारोपणामुळे जलद पुनर्प्राप्तीसारखे फायदे मिळतात. तथापि, ते प्रत्येकासाठीच योग्य ठरतील असे नाही.






