संग्रहित फोटो
आपण जेव्हा ‘फिजिओथेरपी’ हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर बहुतेकवेळा एखादा खेळामध्ये दुखापत झालेला खेळाडू बरा होत असल्याबाबत विचार येतो. त्याचबरोबर फ्रॅक्चरनंतर हालचाल न करू शकणारा रुग्ण किंवा दीर्घकाळच्या पाठदुखीने त्रस्त असलेला इतर कोणी. म्हणजेच ‘फिजिओथेरपी’ ही दशकानुदशके ‘फक्त-जखम’ या साच्यात अडकलेली ही शाखा होती. मात्र आजची फिजिओथेरपी ही हाडे, सांधे आणि जखमेनंतरचे पुनर्वसन याच्याही खूप पुढे गेली आहे.
भारतामध्ये जवळपास ३०–४०% कर्मचारी हे दीर्घकाळचा थकवा, कमी झोप किंवा ताणामुळे होणाऱ्या शारीरिक वेदनांनी त्रस्त आहेत. या स्थितीमध्ये फिजिओथेरपीची भूमिका महत्त्वाची असूनही अनेकदा ती पुरेशा महितीअभावी व जंजागृतीअभावी दुर्लक्षित राहते.
जखमांच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन
‘जर मी जखमी नाही, तर मी फिजिओथेरपिस्टकडे का जावे?” हा अजूनही सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे फिजिओथेरपीचे परिभाषा बदलणे गरजेचे आहे. फिजिओथेरपी म्हणजे फक्त दुखापतीमधून बाहेर काढणे होत नाही तर त्यापुढे जाऊन शरीर कार्यक्षमता, चपळपणा आणि सक्षमता वाढविणे होय. तसेच शरीराची देखभाल म्हणून पाहायाला हवे. फिजिओथेरपीला व्यापक संकल्पना असूनही अजूनही प्रतिक्रियात्मक किंवा पुनर्वसनात्मक उपचार मानले जाते. यामुळे तिची थकवा, चुकीचा पोश्चर, मानसिक थकवा आणि कामाशी निगडित ताण यांसारख्या दैनंदिन आरोग्य समस्यांवरची सक्रिय आणि सर्वसमावेशक भूमिका मर्यादित राहते.
जीवनशैलीमुळे निर्माण झालेला ताण, जास्त वेळ स्क्रीनसमोर बसणे, दूरचा प्रवास आणि तणावपूर्ण नोकऱ्या या आधुनिक दिनचर्येमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा वाढत आहे. ताण हा फक्त मनातच राहत नाही; तो शरीरावरही त्याचा ठसा उमटवतो. घट्ट झालेले स्नायू, बदललेला श्वासोच्छ्वास, चुकीचा बसण्याचा पोश्चर, बिघडलेली झोप, सततची डोकेदुखी, अगदी पचनाच्या समस्या हे सर्व लक्षणे शरीराला ‘ओव्हरलोड’ झालेला ताण हे दाखवणारे लक्षणे आहेत.
फिजिओथेरपी येथे हस्तक्षेप करते व महत्वाची भूमिका बजावते. यामध्ये श्वास घेण्याचे प्रशिक्षण, मॅन्युअल थेरपी आणि हालचालींचे पुनःप्रशिक्षण या तंत्रांमुळे “फाईट ऑर फ्लाईट” ही सिस्टिम शांत होते. तर ‘रेस्ट अँड डाइजेस्ट’ प्रतिक्रियाही मजबूत होते आणि शरीराचा समतोल पुन्हा प्रस्थापित होतो. मन शांत करण्याच्या थेरपीमुळे (रीलॅक्सेशन) कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालिन कमी होतात. तर सेरोटोनिन आणि मेंदूतील ताण कमी करून झोप आणि आराम मिळवायला मदत करनार व शांतता देणारं नैसर्गिक रसायन (GABA) वाढते. त्यामुळे रुग्ण चांगली हालचाल करतो व शांत झोपु शकतो आणि लवकर बराही होतो.
कोणीही अगदी २ ते ५ मिनिटांच्या श्वसन प्रक्रियेने स्वतःला करून स्नायुसंस्था नियंत्रित करण्यापासून सुरुवात करू शकतो. त्यानंतर ३ मिनिटांचा मान आणि खांदा सैल करण्याचा व्यायाम स्नायुतील कडकपणा कमी करण्यासाठी आहे. मग ५ मिनिटांचे धावणे किंवा जागीच चालणे हे रक्ताभिसरण वाढवते. नंतर शरीरासाठी कमरेपासून खालच्या भागासाठी पाच वेळा अर्धे बैठे व्यायाम करावेत. शेवटी ५–१० मिनिटे फिजिओला अनुसरून मार्गदर्शित चालणे आणि श्वसन करून दिवस संपवावा. यामुळे व्यक्तीला ताजेतवाने आणि शरीरात ऊर्जा वाढते. या पद्धतींमध्ये केवळ १५ मिनिटांचा वेळ देऊन दीर्घकालीन आरोग्याचे आपण रक्षण करू शकतो.
पुनर्वसनाच्या पलीकडे
बहुआयामी दृष्टिकोनातून बालरोगांमध्येही फिजिओथेरपिस्ट हे बालकांच्या विकासात विलंब होणाऱ्या किंवा जन्मजात व्यंग असलेल्या मुलांना मदत करतात. तर स्त्रियांच्या आरोग्यामध्ये ते गर्भधारणा, प्रसूतीनंतरची काळजी आणि पेल्विक काळजीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. यंदाच्या फिजिओथेरपी दिनाचा विषय ‘हेल्दी एजिंग’ आहे, म्हणजेच यामध्ये फक्त शारीरिक हालचाल, व्यायाम, गतिशीलता वाढवणे इतकेच नव्हे तर चालताना तोल सांभाळण्याचे स्वातंत्र्य टिकवणे यावरही भर दिला आहे.
उपचाराऐवजी प्रतिबंध
नव्या दृष्टिकोनात ‘आजार बरा करणे’ पासून ‘आरोग्य टिकवणे’ असा बदल होत आहे. पाठदुखी होण्यापूर्वी पोश्चर सुधारणे, श्वसन आरोग्यासाठी श्वासोच्छ्वासाचे प्रशिक्षण घेणे, किंवा उर्जेची बचत करण्यासाठी हालचाल सुधारून घेणे यामुळे फिजिओथेरपी दीर्घकालीन आरोग्यसुरक्षेसाठी पहिले प्राधान्य असलेली साधन ठरते. ती जितकी स्नायू किंवा सांधे मजबूत करण्याबाबत आहे, तितकीच ताण आणि हार्मोन्स नियंत्रित करण्याबाबत उपयुक्त आहे.
गैरसमज तोडणे, जागरूकता वाढवणे
फिजिओथेरपीभोवतीचे अनेक जुने गैरसमज हे प्रामुख्याने जागरूकतेच्या अभावामुळे आहेत. खूपदा तिला वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेनंतरचा शेवटचा टप्पा मानले जाते. परंतु प्रत्यक्षात ती प्रतिबंधात्मक, पुनर्संचयित करणारी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेतील आवश्यक पहिला टप्पा आहे. औषध, जीवनशैली आणि आरोग्य यांच्यामधील एक सांधा आहे. म्हणून फिजिओथेरपी २१ व्या शतकातील आवश्यक विज्ञान ठरत आहे. तुमच्याकडे हालचाल करणारे, श्वास घेणारे आणि वय वाढत असलेले शरीर आहे तर तुम्हाला फिजिओथेरपीचा फायदा होऊ शकतो, हे सोपे सत्य आहे.
– डॉ. विपिन बानुगडे (प्रमुख, फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे)