प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागरूकता महत्त्वाची (फोटो सौजन्य - iStock)
वेळीच आजाराचे निदान झाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. डॉ. संजय धनगर, युरोलॉजिस्ट, लेसर, रोबोटिक आणि रिकन्स्ट्रक्शन स्पेशालिस्ट युरोसर्जन अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी Prostate Cancer जागरूकता महिन्यात याविषयी गंभीरपणे भाष्य केले आहे आणि या आजाराविषयी पुरुषांनी व्यक्त होण्याचे आवाहनही केले आहे.
पुरूषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या Prostate Cancer ची सुरूवातीची 5 लक्षणे, वेळीच ओळखा
प्रोस्टेट म्हणजे काय?
प्रोस्टेट ही पुरुषांच्या शरीरातील मूत्राशयाच्या खाली असलेली एक लहान ग्रंथी आहे. ही ग्रंथी वीर्यातील द्रव तयार करते, जो प्रजननासाठी महत्त्वाचा असतो. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे या ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा होणारा आजार. हा कॅन्सर प्रामुख्याने ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळतो, पण आता ३५ ते ४५ वर्षांच्या पुरुषांमध्येही दिसू लागला आहे. या आजाराचे नेमके कारण माहीत नाही, पण वय वाढणे, कुटुंबात अशा आजाराचा इतिहास असणे, वजन जास्त असणे आणि जास्त तेलकट-चरबीयुक्त अन्न खाणे यामुळे धोका वाढतो. हार्मोन्समधील बदल किंवा प्रोस्टेटला होणारी दीर्घकालीन सूज देखील यासाठी कारणीभूत ठरू शकते.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे:
भारतात अनेक पुरुष प्रोस्टेट किंवा लैंगिक आरोग्याविषयी बोलायला लाजतात. यामागे दोन मोठी कारणं आहेत. लाज आणि माहितीचा अभाव हे आहे. अनेक पुरुषांना वाटतं की लघवीच्या समस्या वयानं येतात, त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. काहींना या विषयावर बोलताना अस्वस्थ वाटतं, तर काहींना वाटतं की लोक काय म्हणतील. या भीतीमुळे आणि गप्प राहण्यामुळे आजाराचे वेळीच निदान होत नाही. त्यामुळे उपचार कठीण होतात आणि जीवाला धोका वाढतो.
जीवनशैली बदल ठरतोय प्रोस्टेट कर्करोगासाठी कारणीभूत – कर्करोग तज्ज्ञांचा इशारा
प्रोस्टेट कॅन्सरचे निदान
डॉक्टर सहसा PSA रक्त तपासणी आणि डिजिटल रेक्टल तपासणी करण्याचा सल्ला देतात. या दोन्ही सोप्या आणि वेदनारहित चाचण्या आहेत. या तपासण्यांमुळे प्रोस्टेट कॅन्सर लवकर ओळखता येतो, आणि वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचं आयुष्य वाढू शकतं. म्हणून ५० वर्षांनंतर या तपासण्या नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. जर कॅन्सरचे निदान झाले, तर डॉक्टर रुग्णाच्या अवस्थेनुसार योग्य उपचार योजना ठरवतात.
या कॅन्सरचे व्यवस्थापन हे त्याच्या टप्प्यानुसार केले जाते आणि त्यात शस्त्रक्रिया, किरणोत्सार उपचार, हार्मोन थेरपी किंवा औषधोपचारांचा समावेश असू शकतो. फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त संतुलित आहार, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा त्याग, नियमित व्यायाम आणि धूम्रपान टाळणे या उपायांनी या कॅन्सरपासून बचाव करता येतो. आता वेळ आली आहे की पुरुषांनी त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याबद्दल खुल्या मनाने बोलले पाहिजे. जेणेकरून आजाराचे वेळीच निदान होऊ शकेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






