भारतीय विवाह संस्कृतीची लोकप्रियता जगभर आहे. यातीलच एक परंपरा म्हणजे लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते. भारत हा पुरुषप्रधान देश असून मुली सासरी राहतात. असं म्हणतात की, स्त्रियांना दोन्ही घरं सांभाळण्य़ाचं कसब जे निसर्गत: असतं. त्यामुळे सासर आणि माहेर या दोन्ही घरचे नातेसंबंध सांभाळणं स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. त्यामुळे लग्नानंतर मुली सासरी जाण्याची प्रथा ही पुराणकाळापासून सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी, काही असे ठिकाणं आहेत जिथे मुली नाही तर मुलं सासरी जातात.
भारतात अशी दोन ठिकाणं आहेत ज्यांना जावयांचं गाव असं म्हटलं जातं. मेघालयात खासी आणि गारो या आदिवासी जमातीची लोकं डोंगर कपाऱ्यात राहतात. या आदिवासी जमातीत मातृसत्ताक पद्धत आहे. या आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना विशेष मान दिला जातो. इतर भारतीय संस्कृतीत महिलांना फारसे अधिकार दिले जात नाहीत मात्र या आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना अधिकार, स्वातंत्र्य आणि सन्मान सर्वाधिक दिला जातो.
या आदिवासी जमातीमध्ये विवाह संस्कृती देखील तितकीच हटके आहे. लग्नानंतर मुली सासरी जात नाहीत तर मुलं घरजावई होतात. सहासा पाहायला गेलं तर घरजावयाला समाजात फारसा मान दिला जात नाही मात्र खासी आणि गारो या आदिवासी जमातीत घरजावयाचा सन्मान केला जातो. लग्नमध्ये मुलीला घर जमीन दिली जाते. इतकंच नाही तर सगळी संपत्ती देखील मुलींच्या नावे केली जाते. घरच्या संपत्तीमध्ये मुलींना सर्वाधिक हिस्सा दिला जातो. या जमातीत मातृसत्ताक पद्धत असल्या कारणाने कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय महिला घेतात. त्यांच मत अंतिम मानलं जातं. एवढंच नाही तर जन्माला येणारी पिढी ही वडीलांचं नाही तर आईच नाव लावते. मुलगी झाली लक्ष्मी आली असं म्हटलं जातं पण हा विचार खऱ्या अर्थाने मेघालयातील आदिवासी समाजात पाहायला मिळतो. इथे मुलगी जन्माला आली तर आनंद व्यक्त केला जातो. कारण मुलगी परक्याचं धन नाही तर कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जातो. या समाजातील लोकं फार शिकलेले नसले तरी या समाजात महिलांना सर्वात जास्त आदर आणि सन्मान दिला जातो.
याच प्रमाणे आणखी एक गाव म्हणजे उत्तरप्रदेशमधील हिंगुलपूर. या ठिकाणाला जावयांचं गाव म्हटलं जातं. एक काळ असा होता की या गावात स्त्रीभ्रुण हत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यामुळे आपल्या लेकी वाचण्य़ासाठी या गावाने एक वेगळा निर्णय घेतला. गावातील मुलींचं प्रमाण कमी होऊ नये याकरीता मुलीच्या लग्नानंतर मुलगी सासरी न जाता मुलगा सासरी नांदू लागला. त्यामुळे या गावाला देखील जावयांच गाव असं म्हटलं जातं.