दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरांचा प्रसादच आहे दैवी आशीर्वाद; खाद्यसंस्कृतीही पाडते भुरळ, पाहा कोणते? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
south india holy cities temples food culture : दक्षिण भारताची ओळख केवळ भव्य मंदिरांपुरती मर्यादित नाही. येथील संस्कृती, परंपरा आणि पाककला यांचा संगम खरोखरच अनोखा आहे. हजारो वर्षांचा वारसा सांगणारी मंदिरे, शिल्पकला आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांचा स्वाद, पर्यटकांच्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतो. देवदर्शनाच्या पुण्याईसोबत पोटाची मेजवानीही येथे मिळते. चला तर मग जाणून घेऊ या दक्षिण भारतातील अशी ६ खास शहरे, जिथे अन्न आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ अनुभवता येतो.
“पूर्वेचे अथेन्स” म्हणून ओळखले जाणारे मदुराई हे तामिळनाडूचे हृदय आहे. इथले मीनाक्षी अम्मन मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील आध्यात्मिक वातावरण मन भारावून टाकते. पण यासोबतच मदुराईचे स्ट्रीट फूड प्रवासाला वेगळीच चव देते. येथील जिगरथंडा (थंडाईसारखे पेय), करी डोसा आणि मसालेदार मटण चुका पर्यटकांना मोहात पाडतात. देवदर्शनानंतर गरमागरम डोश्याचा घास घेतल्यावर प्रवासाची थकवा क्षणात नाहीसा होतो.
हे देखील वाचा : पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?
उडुपी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ते म्हणजे श्रीकृष्ण मंदिर. येथे भक्ती आणि अन्न यांचे अतूट नाते आहे. मंदिरातील अन्नप्रसाद हा केवळ जेवण नसून तो एक आध्यात्मिक अनुभव मानला जातो. उडुपीचे डोसे, सांबार, रस्सम, लाडू आणि तुपाने भरलेले विविध पदार्थ आज जगभर प्रसिद्ध आहेत. कम्युनिटी डायनिंग हॉलमधील सात्विक अन्न तुम्हाला साधेपणातली चव शिकवते.
वारशाची आणि परंपरेची नगरी म्हणजे कांचीपुरम. येथे एकंबरेश्वर मंदिर आणि कैलाशनाथ मंदिर प्राचीन दैदीप्यमान इतिहास सांगतात. पण कांचीपुरमला वेगळी ओळख मिळवून देणारे म्हणजे येथील कांचीपुरम इडली. केळीच्या पानावर दिल्या जाणाऱ्या या मसालेदार, वाफवलेल्या इडल्या चविष्ट असतातच, पण त्यामागे शतकानुशतकांची पाककलेची परंपरा दडलेली आहे. मंदिरदर्शनानंतर येथे मिळणारे स्थानिक जेवण प्रवाशांचा अनुभव अधिक संस्मरणीय करते.
आंध्र प्रदेशातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर हे जगभरातील श्रद्धाळूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. येथे मिळणारे लाडू प्रसाद भक्तीभावाने दिले जातात. देशी तुपात बनवलेले हे लाडू केवळ गोड पदार्थ नाहीत, तर ते श्रद्धेचे प्रतीक आहेत. याशिवाय आंध्र करी, चटणी, मऊ वडे यांचा आस्वाद येथे मिळतो. मंदिरप्रांगणात चवी आणि अध्यात्म यांचे संगम घडतो.
रामेश्वरम हे तामिळनाडूचे एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान आहे. रामनाथस्वामी मंदिर येथे दररोज हजारो भक्त येतात. पण या शहराची खरी मजा म्हणजे येथील खाद्यसंस्कृती. परंपरागत शाकाहारी अन्नाबरोबरच समुद्रकिनाऱ्याजवळ मिळणारे मासे, कोळंबी आणि खेकडे यांची चव अविस्मरणीय असते. रस्त्यावर मिळणारे इडली आणि मेदू वडा हे स्थानिकांचा आवडता नाश्ता आहे. देवदर्शनानंतर समुद्रकिनाऱ्यावरील हा अनुभव अनोखाच वाटतो.
हे देखील वाचा : Good Luck Sign: ‘हे’ जीव आहेत आनंदाचे दूत; जर घरात आले तर बदलते नशीब आणि उजळते भाग्य
तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. मंदिराभोवतीच्या रस्त्यांवर महिलांनी घरी बनवलेले अप्पलम, लोणची सहज मिळतात. हे पदार्थ स्थानिकांची चव दाखवतात. येथील खास पदार्थ म्हणजे पुलियोधराय प्रसादम (तांदळाचा चिंच-तूप मिश्रित प्रकार). हा एक साधा पण दिव्य स्वादाचा अनुभव आहे. मंदिराच्या गल्लीबोळांतून फिरताना ही चव प्रवासाला अजून खास बनवते.
दक्षिण भारताची सफर केवळ मंदिरदर्शनापुरती मर्यादित नाही. प्रत्येक शहर आपल्याला भक्तीभाव, परंपरा आणि खाद्यसंस्कृती यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला लावते. देवळातल्या घंटानादासोबतच रस्त्यांवरील मसालेदार डोश्यांचा घास, अथवा मंदिरातील सात्विक अन्नाचा स्वाद हे सगळे मिळून प्रवास खऱ्या अर्थाने परिपूर्ण करतात. म्हणूनच, दक्षिण भारतातील ही सहा शहरे प्रत्येक अन्नप्रेमी आणि आध्यात्मिक प्रवाशाने आपल्या यादीत जरूर समाविष्ट करावीत.