ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स रेड कार्पेटवर जलवा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कान्स रेड कार्पेटची निर्विवाद आयकॉन, सुंदर ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. अनेक जण गाऊन आणि विविध फॅशनमध्ये दिसून येत असताना भारतीय परंपरा जपत ऐश्वर्याने मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली हँडलूम व्हाईट बनारसी परिधान केली आहे आणि त्याहीपेक्षा अधिक लक्ष वेधलं ते तिने आपल्या केसांचा भांग काढून भरलेल्या लालभडक कुंकूने.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होणार अशी चर्चा होती. मात्र या सर्व चर्चेला एक चपराक देत ऐश्वर्याने पूर्णविराम लावला आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्याचा जलवा आजही कायम असल्याचे यावेळी दिसून आले. कान्स रेड कार्पेटवर ऐश्वर्या नेहमीच सुंदर दिसते आणि आपल्या वेगळेपणाची छाप सोडते. यावेळी तिचा लुक कसा आहे आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
ऐश्वर्याचा लुक
ऐश्वर्याची हेव्ही हँडलूम व्हाईट बनारसी साडी
ऐश्वर्याने यावेळी मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली हँडलूम व्हाईट बनारसी साडी परिधान केली होती. यामध्ये ती एखाद्या राणीप्रमाणे क्लासी आणि रॉयल दिसते आहे. भारतीय हातमाग – हस्तिदंत, सोने आणि चांदीमध्ये हाताने विणलेला कडवा हस्तिदंत बनारसी हातमाग याचा वापर करून ही साडी तयार करण्यात आली आहे.
कडवा ब्रोकेड तंत्र भारतीय विणकरांच्या अतुलनीय कौशल्याचा खरा पुरावा आहे. वाराणसीच्या प्रसिद्ध यंत्रमागांपासून उद्भवलेल्या, या गुंतागुंतीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक डिझाईन हे स्वतंत्रपणे तयार करण्यात येते असे मनिष मल्होत्राने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
खऱ्या चांदीचे वर्क
साडीवर खऱ्या सोन्याचांदीचे वर्क
साडीमध्ये हाती तयार करण्यात आलेल्या ब्रोकेडचा वापर करण्यात आला असून हाताने भरतकाम केलेली जरी आहे जी खऱ्या चांदीमध्ये अगदी बारीक तपशीलवार जोडण्यात आली आहे, ज्यामुळे या बनारसी साडीची शोभा अधिक वाढली आहे. या साडीसह एक पांढरा टिशू हाताने विणलेला दुपट्टा आहे, जो खऱ्या सोन्या आणि चांदीच्या जरदोजी भरतकामाने विणण्यात आला आहे. या लुकमुळे ऐश्वर्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली असल्याचे दिसून येत आहे.
हेअरस्टाईल
ऐश्वर्याची साधी आणि परफेक्ट हेअरस्टाईल
ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे आपले स्ट्रेट केस सोडले असून मधून भांग पाडला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने यावेळी लालभडक सिंदूर केसांच्या भांगात भरले असून सर्वांचेच याकडे लक्ष वेधले आहे. यावेळी तिने अभिषेकसह घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण अजूनही बच्चन कुटुंबीयांची सून असल्याचे दाखवून दिले आहे. कोणतीही तोंडी उत्तरं न देता आपल्या कृतीतून तिने अफवा पसरवणाऱ्यांवर चपराक लावली आहे.
ऐश्वर्या रायने‘जोधा अकबर’मध्ये परिधान केलेला लेहेंगा ऑस्करमध्ये, नेमकं कारण काय ?
माणिक हिऱ्याचे दागिने
हिरे माणकाचे दागिने
ऐश्वर्याने या साडीसह मनिष मल्होत्राने तयार केलेला ५०० कॅरेटपेक्षा जास्त मोझांबिक माणिक आणि १८ कॅरेट सोन्याचे न कापलेले हिऱ्यांचा बनवलेला नेकलेस परिधान केला आहे. तिने अगदी चोकरपासून ते नेकलेसपर्यंत माणिक परिधान केले असून तिची ही स्टाईल पाहतच राहण्यासारखी आहे. ऐश्वर्याचा हा लुक पाहून तिच्या चाहत्यांची नजरच तिच्यावरून हटत नाहीये.
सटल मेकअप
ऐश्वर्याचा लक्षवेधी मेकअप
ऐश्वर्याने कान्स रेड कार्पेटवर धमाक्यात एंट्री केली आणि तिचा हा लुक खूपच व्हायरल झालाय. ऐश्वर्याने भारतीय परंपरा जपत नेसलेली साडी ही अत्यंत सुंदर दिसून यासह तिने केलेला मेकअपही सटल आहे. फाऊंडेशन, कन्सिलर, हायलायटर, डार्क काजळ, लायनर आणि डार्क मरून रंगाची लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय