आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी
आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःची किडनी दान करून त्याला नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात घडली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील २२ वर्षीय तरुणावर ससून रुग्णालयात मदर टू सन लाईव्ह किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, ही ससून रुग्णालयातील ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ७जानेवारी २०२३ पासून त्याच्यावर डायलिसिस उपचार सुरू करण्यात आले. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने कोणताही विलंब न करता स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – istock)
किडनीरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडीकर व डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लत्ता भोईर तसेच मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मेडिसिन विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, पथक प्रमुख डॉ. हर्षल भितकर व त्यांची टीम, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निरंजन आंबेकर व डॉ. संदीप मोरखंडीकर, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुजित क्षिरसागर तसेच परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेत समाजसेवा अधीक्षक व अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे आणि प्रांजल वाघ यांनी रुग्णास दाखल करण्यापासून ते प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपर्यंत समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
खाजगी रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत खर्व सांगण्यात आला होता. मात्र रुग्णाचे वडील बीव्हीजी ग्रुप अंतर्गत साफसफाईचे काम करतात आणि त्यांना केवळ १३ हजार रुपये मासिक वेतन मिळते. त्यामुळे एवढा मोठा खर्च करणे कुटुंबासाठी अशक्य होते. ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अत्यंत नाममात्र खर्चात केल्या जातात. योजनेबाहेरील काही औषधे, इंजेक्शन, सर्जिकल साहित्य व तपासण्यांचा खर्च सेवाभावी संस्थांच्या मदतीने उभारण्यात येतो.






