फोटो सौजन्य - Social Media
तोंडाचा कर्करोग हा एक गंभीर आजार असून त्याची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. कोणत्याही एका विशिष्ट लक्षणाच्या आधारे हे ठरवता येत नाही की एखाद्या व्यक्तीला तोंडाचा कर्करोग आहे. परंतु, जर तोंडाच्या आत दीर्घकाळ बरा न होणारा घाव असेल, ओठ, हिरड्या किंवा गालांमध्ये गाठ अथवा घट्टपणा जाणवत असेल, तोंडाच्या आतील भागात पांढरे किंवा लालसर ठिपके आढळत असतील, चावणे किंवा गिळण्यास अडचण येत असेल, तर ही तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात.
काही लोकांना तोंड किंवा ओठ सुन्न झाल्यासारखे वाटू शकते, तर काहींना वेदना किंवा जळजळ जाणवते. अचानक दात सैल होणे, हिरड्यांमध्ये सूज येणे किंवा जबड्याला वेदना होणे देखील या आजाराची संभाव्य लक्षणे असू शकतात. काही रुग्णांच्या आवाजात बदल होतो, बोलताना त्रास जाणवतो, तर काहींना गळ्याच्या मागच्या बाजूस गाठ जाणवते. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते.
ओरल कॅन्सर हा अनेकदा सामान्य तोंडाच्या समस्यांसारखा दिसतो. उदाहरणार्थ, काही जणांना तोंडात वारंवार घाव किंवा अल्सर होतात, ज्यामध्ये काही दिवसांत सुधारणा होते. मात्र, तोंडाच्या कर्करोगात हे घाव बरे होत नाहीत आणि सतत वाढत जातात. योग्य वेळी उपचार न केल्यास हा कर्करोग तोंड, गळा, जबडा आणि पुढे जाऊन डोक्याच्या इतर भागात पसरू शकतो. संशोधनानुसार, तोंडाच्या कॅन्सरचे निदान झालेल्या सुमारे ६३% लोकांचे आयुष्य निदानानंतर पाच वर्षांपर्यंत टिकते. त्यामुळे या आजाराची वेळेवर लक्षणे ओळखून उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ओरल कॅन्सर मुख्यतः तोंड आणि ऑरोफॅरिंक्स या भागांवर परिणाम करतो. ऑरोफॅरिंक्स म्हणजे जीभेचा मागचा भाग, तोंडाच्या वरचा भाग आणि गळ्याचा मध्यभाग. जर तोंडात कोणतेही असामान्य बदल दिसत असतील, ते दीर्घकाळ टिकून राहिले असतील आणि त्रासदायक वाटत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटखा, मद्यपान, धूम्रपान आणि असंतुलित आहार यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे, तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास तोंडाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते.