फोटो सौजन्य - Social Media
गोरं दिसावं असं कोणाला वाटत नाही? मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं आणि त्यासाठी त्वचा उजळ असावी, अशी इच्छा असते. बर्याच ठिकाणी गोरेपणाला सौंदर्याचा निकष मानला जातो. त्यामुळे मार्केटमध्ये अनेक क्रीम्स आणि ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, ज्या त्वचा झटपट उजळ करण्याचा दावा करतात. अनेक लोक फेअरनेस ट्रीटमेंट करून आपल्या त्वचेचा रंग हलका करण्याचा प्रयत्न करतात.
फेअरनेस क्रीम्स, स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट, केमिकल पील आणि लेझर थेरपी यांसारख्या पद्धती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. पण या ट्रीटमेंट्सच्या परिणामांबद्दल विचार केलात का? काही तासांत उजळ दिसण्याच्या नावाखाली आपण आपल्या त्वचेसाठी गंभीर धोका पत्करत आहोत. या ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स त्वचेवर तात्पुरता परिणाम करत असले तरी, त्यांचे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात.
फेअरनेस ट्रीटमेंटमध्ये केमिकल पील, लेझर ट्रीटमेंट, ब्लीचिंग एजंट्स आणि मायक्रोडर्माब्रेशन यांसारख्या पद्धतींचा वापर केला जातो. केमिकल पीलमध्ये त्वचेची वरची थर हटवण्यासाठी अॅसिडचा वापर केला जातो, तर लेझर ट्रीटमेंटमध्ये त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण कमी केले जाते. ब्लीचिंग एजंट्समध्ये हायड्रोक्विनोन आणि स्टेरॉइडयुक्त घटक असतात, जे त्वचेचा रंग हलका करण्यासाठी वापरले जातात. मायक्रोडर्माब्रेशन प्रक्रियेत त्वचेचे एक्सफोलिएशन करून नव्या त्वचेचा थर बाहेर आणला जातो.
तथापि, या ट्रीटमेंट्समुळे त्वचेच्या नैसर्गिक संरचनेवर परिणाम होतो. फेअरनेस ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स त्वचेचा ओलसरपणा कमी करतात, ज्यामुळे ती अधिक संवेदनशील होते. परिणामी, सूर्यप्रकाशात सहज जळणे, लालसरपणा आणि कोरडेपणा जाणवतो. काही प्रकरणांमध्ये या ट्रीटमेंटमुळे त्वचा कर्करोगाचा धोका देखील वाढतो. WHO ने हायड्रोक्विनोन आणि मरकरीसारख्या घटकांच्या दुष्परिणामांबद्दल इशारा दिला आहे.
याशिवाय, स्टेरॉइडयुक्त क्रीम्सचा जास्त वापर केल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे मुरूम, अनावश्यक केसांची वाढ आणि अचानक वजन वाढ यांसारख्या समस्या निर्माण होतात. काही वेळा फेअरनेस ट्रीटमेंटमुळे हायपरपिग्मेंटेशन होऊन त्वचेच्या काही भागांचा रंग अधिक गडद होतो. लेझर आणि केमिकल पीलनंतर त्वचा अधिक नाजूक होते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
सौंदर्य आणि त्वचा उजळ करण्याच्या नावाखाली घातक रसायनांचा वापर केल्याने लवकर वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. या ट्रीटमेंट्समुळे त्वचेची लवचिकता कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या आणि डाग लवकर उमटू शकतात. त्यामुळे त्वचेचा रंग बदलण्याची कोणतीही प्रक्रिया नैसर्गिक नसते आणि तिचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे अधिक सुरक्षित आहे. गोरेपणापेक्षा निरोगी आणि स्वच्छ त्वचेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.