LDL कोलेस्ट्रॉलवरील उपाय (फोटो सौजन्य - iStocK)
आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेकविध घटक आहेत. हृदयाच्या आरोग्याला असलेल्या धोक्यांचा विचार करताना, सामान्य लोक ज्याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखतात त्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी, हे चिंतेचे प्रमुख कारण मानले जाते. आनुवंशिकतेने येणारा किंवा वयोपरत्वे होणारे हृदयरोग आपल्या हातात नसतात पण LDL कोलेस्टेरॉल मात्र सक्रियपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते आणि डॉक्टरांद्वारे शिफारस केल्या जाणाऱ्या स्तरावर राखले जाऊ शकते.
चरबीचा थर होतो जमा
एलडीएलसीचा स्तर वाढल्यामुळे धमन्यांमध्ये चरबीचे थर जमा होतात आणि अडथळे निर्माण होऊन रक्तप्रवाहावर निर्बंध येतात. याची परिणती हृदयविकार व पक्षाघाताच्या झटक्यांमध्ये होऊ शकते. म्हणूनच एलडीएलसीचे प्रमाण आटोक्यात राखणे व ते आवश्यक तेवढ्याच स्तरावर राखणे महत्त्वाचे आहे. एलडीएल वाढल्याची स्पष्ट लक्षणे सामान्यपणे जाणवत नसल्याने नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करून घेणे अत्यावश्यक ठरते. चाचणीबाबत सजग असणे ही वाढलेल्या एलडीएल कोलेस्टेरॉलची समस्या हाताळण्यातील पहिली पायरी आहे.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने (सीएसआय) २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अगदी लवकर म्हणजे वयाच्या १८व्या वर्षापासून कोलेस्टेरॉल तपासून घेण्याची शिफारस केली आहे. एलडीएलसीच्या वाढलेल्या स्तराचे निदान लवकर झाल्यास उपचार सोपे होतात आणि एलडीएलसीचे व्यवस्थापन अधिक चांगले करता येते.
डॉक्टरांचा सल्ला
चाचणीचे निकाल हाती आल्यानंतरची पुढची पायरी म्हणजे व्यक्तीनुरूप सल्ल्यासाठी कार्डिओलॉजिस्टना भेटणे होय. आरोग्यसेवा देणारे डॉक्टर एलडीएलसीच्या लक्ष्यांचा अंदाज बांधतील, विशेषत: रुग्णाला किती धोका आहे हे समजून घेऊन ते लक्ष्य निश्चित करतील. एलडीएलसी लक्ष्य हे वैश्विक नसते, ते रुग्णानुसार बदलते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णाचे वय, आनुवांशिकता, जीवनशैली, अन्य सहव्याधी यांच्या आधारे डॉक्टर लक्ष्य निश्चित करतात. विशेषीकृत मार्गदर्शनाद्वारे रुग्णाच्या विशिष्ट आरोग्यविषयक गरजा व धोके यांच्यानुसार कोलेस्टेरॉल व्यवस्थापन योजना तयार केली जाते. यांत व्यक्तीचे स्वत:चे प्राधान्यक्रम, आवश्यकता, सांस्कृतिक संदर्भ व जीवनशैलीशी निगडित घटक लक्षात घेतले जातात.
तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे?
मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान सांगतात, “वाढलेल्या एलडीएल कोलेस्टेरॉलवरील उपचार लवकर झालेल्या निदानासह सुरू होतात. लिपिड प्रोफाइल हे सुलभ साधन आहे आणि प्रत्येकाने दैनंदिन आरोग्य तपासणीत त्याचा समावेश केला पाहिजे. एलडीएल कोलेस्टेरॉल वाढल्याचे निदान झाल्यानंतर उपचारांमध्ये तपशीलवार योजनेचा अवलंब करणे आवश्यक आहे. वाढत्या कोलेस्टेरॉलकडे लक्ष देणे का आवश्यक आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे कसे धोक्याचे आहे हे स्पष्ट करून सांगण्यासाठी रुग्णाचे समुपदेशन करणे गरजेचे असते. समतोल पोषण, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसाठी जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणे आवश्यक असते. दर काही महिन्यांनी लिपिड प्रोफाइल करत राहिल्यास उपचारांचा परिणाम होत असल्याची निश्चिती होते. औषधे काटेकोरपणे घेतली पाहिजेत आणि ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. एलडीएल नियंत्रणात आल्यानंतर औषधे घेणे बंद केल्यास ते पुन्हा वाढू शकते. रुग्णांनी कोलेस्टेरॉलवरील उपचारांकडे आयुष्यभराची बांधिलकी म्हणून बघणे गरजेचे आहे. शिस्त आणि सातत्य यांच्या माध्यमातून एलडीएल प्रभावीरीत्या व्यवस्थापित करणे आणि हृदयविकार व पक्षाघाताचे झटके टाळणे पूर्णपणे शक्य आहे.”
कसे आहेत उपाय?
उपचारांची पद्धतही गेल्या काही वर्षांत बदलली आहे आणि त्याचे परिणाम एलडीएल कोलेस्टेरॉल व्यवस्थापनात दिसून येत आहेत. पूर्वी मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये एलडीएलसीचा स्तर १३० एमजी/डीएलच्या वर गेल्यास तसेच मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये हा स्तर १६० एमजी/डीएलच्या वर गेल्यास औषधे दिली जात होती. अनेकदा लोकांना यातील बदलांची माहिती दिली जात नाही, त्यामुळे केवळ धोकादायक स्थितीतील रुग्णांनाच औषधे दिली जातात असे समजले जाते.
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणाऱ्या औषधांचा वापर अधिक व्यापक पद्धतीने करण्याची सूचना यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (एनएचएस) मार्गदर्शक तत्त्वांच्या नवीन मसुद्यात करण्यात आली आहे, पुढील दहा वर्षांत हृदयविकार किंवा पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता १० टक्क्यांहून कमी असलेल्या व्यक्तींनाही ही औषधे दिली जावीत अशी शिफारस या मसुद्यात करण्यात आली आहे. हा बदल जागतिक स्तरावर समाविष्ट करून घेण्यात आला आहे आणि लवकर कृती करण्याच्या बदललेल्या दृष्टीकोनात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे.
कशी घ्यावी काळजी?
हृदयाची काळजी घेण्याची सुरुवात आहार आणि जीवनशैलीतील बदलांपासून होऊ शकते. फळे-भाज्या तसेच पूर्ण धान्यांनी समृद्ध असलेला आहार घेतल्यास हृदयाच्या एकंदर आरोग्यासाठी ते उत्तम ठरते, असे समजले जाते. वैविध्यपूर्ण पोषकांचा समावेश असलेले समतोल जेवण ही तर नेहमीच चांगली सवय आहे. मेदयुक्त अन्नपदार्थ खातानाही त्यांच्या प्रमाणाबद्दल तसेच अन्नाच्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहिल्यास कार्डिओव्हस्क्युलर आरोग्यासाठी ते चांगले असते.
एकंदर आरोग्य, अन्नाची निवड, सांस्कृतिक संदर्भ अशा अनेकविध घटकांचा विचार करून आरोग्यतज्ज्ञ आपल्याला सर्वांत अनुकूल असा आहार निश्चित करू शकतात. आरोग्याला पूरक असे वजन राखणेही हृदयाच्या एकंदर आरोग्यासाठी आवश्यक आहे. अतिरिक्त वजन, मग ते अगदी काही किलो अतिरिक्त का असेना, कोलेस्टेरॉलवर परिणाम करू शकते. अतिरिक्त वजनामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचा स्तर वाढू शकतो. मध्यम तीव्रतेचा व्यायाम सातत्याने करत राहिल्यास आरोग्यात चांगला बदल घडून येऊ शकतो आणि एलडीएलसी स्तर कमी करण्यासही मदत होते. अधूनमधून केलेला व्यायामही चांगले चांगले परिणाम घडवून आणतो. शारीरिक हालचाल, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि कार्डिओ ट्रेनिंग यांमुळे एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारल्याचे दिसून आले आहे. एचडीएल कोलेस्टेरॉल हे ‘गुड कोलेस्टेरॉल’ समजले जाते, ते इंद्रियांमधून एलडीएल कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते.
व्यायाम महत्त्वाचा
तरीही केवळ व्यायाम हा वाढलेल्या कोलेस्टेरॉलपासून सुरक्षित करणारा उपाय ठरू शकत नाही हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. पराकोटीची शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच परिपूर्ण आरोग्य असे गृहीत धरणे चुकीचे आहे. अगदी उच्चस्तरीय क्रीडापटूंमध्येही एलडीएलची पातळी वाढलेली दिसून आलेली आहे. क्रीडापटूंमधील आकस्मिक मृत्यूंमागे कार्डिअॅड डेथ (एससीडी) हे वैद्यकीय कारण मोठ्या प्रमाणात आढळते. कठोर व्यायामाची सवय व आरोग्यपूर्ण आहार हे हृदयविकारांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही. एलडीएलसी स्तराचे व्यवस्थापन करण्यात आणि त्यायोगे आरोग्यपूर्ण जीवनशैली राखण्यात औषधांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे.
नवीन उपाय
पारंपरिक औषधांनी ज्या रुग्णांमध्ये सुयोग्य परिणाम दिसून येत नाहीत, त्यांच्यासाठी नवीन प्रगत उपचारपद्धती सुरक्षित व प्रभावी पर्याय म्हणून उदयाला येत आहेत. पीसीएसकेनाइन इनहिबिटर्स, एसआयआरएनए-बेस्ड उपचार आणि इन्क्लिसायरन यांसारख्या लक्ष्याधारित उपचार पद्धती रुग्णांना एलडीएलसी लक्ष्ये गाठून देण्यात आश्वासक कामगिरी करत आहेत. नियमित उपचार पुरेसे ठरत नाहीत, तेव्हा हे उपचार उपयोगात आणले जात आहेत.
आरोग्यसेवा पुरवण्यात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांशी चर्चा करण्यामुळे जीवनशैलीतील बदल व औषधे यांचे सर्वोत्तम संयोजन केले जाऊ शकते आणि ते संयोजन हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यात उपयुक्त ठरते.