दातांच्या पोकळीपासून सुटका मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
हल्ली प्रत्येक व्यक्तीला दातांच्या समस्या उद्भवू लागतात. दातांना कीड लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे तोंडाच्या समस्या उद्भवून दातांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. दातांना कीड लागल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात हिरड्यांमध्ये बारीक काळा डाग दिसू लागतो. त्यानंतर हळूहळू तिथे छिद्र बनतो आणि वेदना होण्यास सुरुवात होते. दातांमध्ये पोकळी निर्माण झाल्यानंतर बऱ्याचदा असह्य वेदना होऊ लागतात. जास्त गोड पदार्थ खाणे, दात न स्वच्छ करणे किंवा योग्यरित्या ब्रश न केल्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून दातांना लागेल कीड नष्ट होईल आणि वेदनांपासून सुटका मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
सतत गोड पदार्थ खाणे, जेवणानंतर दात स्वच्छ न करणे, हिरड्यांच्या समस्या, दातांमध्ये पडलेला खड्डा इत्यादी अनेक गोष्टींमुळे दात खराब होऊ लागतात. दात खराब झाल्यानंतर तोंडातून दुर्गंधीचा घाणेरडा वास येऊ लागतो. तर बऱ्याचदा लक्षणे वाढल्यानंतर दात तुटणे किंवा पडणे, तोंडाची दुर्गंधी, सूज किंवा पू येणे, ताप किंवा संसर्ग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
भारतीय मसाल्यांमध्ये असलेले गुणधर्म केवळ जेवणाची चवच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी असतात. दातांमध्ये लागलेली कीड किंवा हिरड्यांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लवंग गुणकारी ठरते. यासाठी लवंगाचा बारीक तुकडा कीड लागलेल्या ठिकाणी ठेवावा. त्यानंतर १५ मिनिटांनी दात पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. लवंग दाताच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते.
दातांच्या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी पेरूची पाने अतिशय प्रभावी ठरतात. नियमित एक किंवा दोन पेरूची पाने चावून खाल्ल्यास तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. याशिवाय दातांवर वाढलेला पिवळा आणि पांढरा थर कमी करण्यासाठी पेरूची पाने महत्वाची ठरतात.