मासिक पाळीदरम्यान सतत लघवी का होते (फोटो सौजन्य - iStock)
मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, असह्य पोटदुखी आणि डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या इतर लक्षणांमुळे मासिक पाळी महिलांसाठी चिंताजनक ठरु शकते. इतकेच नाही तर काही महिलांना वारंवार लघवीचा जावे लागू शकते. मासिक पाळी दरम्यान महिलांना वारंवार लघवीचा जावे लागणे हे सामान्य लक्षण आहे. मात्र हे कधीकधी गोंधळात टाकणारे असू शकते, कारण ते मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (UTI) लक्षण आहे किंवा मासिक पाळीचा एक सामान्य भाग आहे. त्यामागती कारणं समजून घेतल्यास गोंधळ दूर करता येतो आणि अनावश्यक चिंता कमी होण्यास मदत होते. डॉ. विंग कमांडर सुशील डी. गरुड, लॅप्रोस्कोपिक आणि युरो-गायनेकोलॉजी सर्जन, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे यांनी याबाबत खुलासा करत योग्य माहिती दिली आहे.
मासिक पाळी येणे आणि वारंवार लघवी होणे यातील परस्पर संबंध काय?
मासिक पाळी दरम्यान, शरीरात हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॅानमधील बदल मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतात. अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी फुगणे आणि पाणी साचणे अशा समस्या दिसून येतात जे रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कमी कमी होऊ लागते ज्यामुळे वारंवार लघवीस जावे लागते. दुसरे कारण म्हणजे गर्भाशयाचे आकुंचन.
गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडल्याने, ते मूत्राशयावर दाब आणू शकते आणि तुम्हाला वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासू शकते. जळजळ, वेदना, लघवीला फेस येणे, ताप किंवा ओटीपोटात अस्वस्थता यासारखी लक्षणे आढळल्यास ते मूत्रमार्गाच्या संसर्गाचे संकेत ठरु शकतात. अशा परिस्थितीत, मूत्र चाचणी आणि वेळीच उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहिल. मासिक पाळी दरम्यान महिलांनी त्यांच्या लक्षणांचा मागोवा घ्यावा. जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
मासिक पाळी आणि वारंवार लघवीशी संबंधित गैरसमज आजच दूर करा
१. गैरसमज: मासिक पाळी दरम्यान वारंवार लघवी होणे म्हणजे यूटीआय
वास्तविकता: हार्मोनल बदल आणि गर्भाशयाच्या दाबामुळे संसर्गाशिवाय लघवीचे प्रमाण वाढू शकते. म्हणून घाबरू जाऊ नका कारण हे सामान्य आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील .
२. गैरसमज: कमी पाणी पिल्याने वारंवार लघवीस जावे लागणार नाही
वास्तविकता: दररोज किमान २-३ लिटर पाणी पिण्याची खात्री करा. तुम्हाला वारंवार लघवी होत असल्याने, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी पिणे टाळाल. शरीराला योग्य हायड्रेशन गरजेचे आहे. म्हणून तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
३. गैरसमज: मासिक पाळीच्या स्वच्छतेचा UTI शी काहीही संबंध नाही
वास्तविकता: अस्वच्छता किंवा मासिक पाळी दरम्यान पॅडचा दीर्घकाळ वापर हा संसर्गाची शक्यता वाढवू शकतो. म्हणून योग्य स्वच्छता राखण्याची प्रयत्न करा. योनीमार्ग केवळ पाण्याने स्वच्छ करा; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाऊचिंग करणे किंवा कोणतेही नाजूक भागात कोणतेही रासायनिक उत्पादन वापरणे टाळा. दर ३-४ तासांनी पॅड बदला आणि सैल व सूती कपडे घाला. आपल्या शरीराचे ऐका आणि मासिक पाळीच्या काळात चांगली स्वच्छता राखल्यास शरीर निरोगी राखता येते.
मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






