मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 18 वर्षांवरील व्यक्तींमध्ये मधुमेह आढळण्याचे वय 2014 या वर्षी 8.5% इतके होते. भारतात 7.2 कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह आहे. ग्रामीण भारताच्या तुलनेने शहरी भागांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे.
मधुमेह हा ‘सायलेंट किलर’ आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींवर डायबेटिक रेटिनोपथी हा आजार हल्ला करतो. जेव्हा रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, परिणामी रेटिनामधील रक्तवाहिनीला इजा होते तेव्हा हा आजार होतो. या आजारात त्या व्यक्तीची दृष्टी जाते किंवा दृष्टिदोष निर्माण होतो. मधुमेहावर नियंत्रण मिळवूनही अंधत्वाची शक्यता जास्त असते. त्यामुळे रेटिनाची तपासणी करणे अत्यावश्यक व महत्त्वाचे ठरते. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहींमध्ये डायबेटिक रेटिनोपथी हा आजार उद्भवू शकतो. डोळ्यांमध्ये डाग पडणे, धुसर दिसणे, रंग न समजणे, रात्री व्यवस्थित न दिसणे, दृष्टीच्या मध्यभागी काळोखे किंवा रिकाम्या जागा दिसणे इत्यादी सुरुवातीची लक्षणे असतात. अंधत्व कदाचित पुढील टप्प्यावर ओढवू शकते असे असले तरी या लक्षणांकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. डायबेटिस रेटिनोपथीचे चार टप्पे असतात.
सौम्य नॉनप्रोलिफरेटिव्ह रेटिनोपथी
हा पहिला टप्पा असतो. यात रेटिनाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म गुठळ्या निर्माण होतात आणि त्या डोळ्यांच्या पडद्यांमधून बाहेर येतात. काही वेळा रेटिनावर द्रावाची किंवा रक्ताची गळती होते. सुरुवातीच्या टप्प्यातअंधत्व येत नाही. पण या टप्प्यावर दोन्ही डोळ्यांवर परिणाम झाला असेल आणि त्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणून वार्षिक तपासणी करून घेणे हितावह असते.
मध्यम स्वरुपाची नॉनप्रोलिफरेटिव्ह रेटिनोपथी
हा दुसरा टप्पा असतो जिथे रेटिनामधील रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते. रक्त वाहून नेण्याची क्षमता नसल्याने त्या अजून बारीक होतात. परिणामी डायबेटिक मॅक्युलर ओडेमा उद्भवतो. मॅक्युला हा डोळयातील पडद्याचा एक भाग आहे जो सरळ समोरच्या दृष्टीसाठी जबाबदार आहे (वाहन चालवताना किंवा पोहोचताना). दुसऱ्या टप्प्यावर दृष्टीला धोका असतो. जास्त नुकसान होऊ नये यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेण्याची शिफारस डॉक्टर करतात.
गंभीर स्वरुपाची नॉनप्रोलिफरेटिव्ह रेटिनोपथी
हा तिसरा टप्पा असतो. या टप्प्यावर रक्ताच्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे रेटिनाला रक्ताचा पुरवठा कमी होतो. आणि स्कार टिश्यू तयार होण्यास सुरुवात होते. रक्तपुरवठा कमी असल्यामुळे रक्तवाहिन्यांना पूर्ण अडथळा निर्माण होतो. त्यामुळे काळे डाग व धुसर दृष्टी होते. परिणामी, पुढे जाऊन मॅक्युलर इस्किमिया होऊ शकतो. या ठिकाणी व्यक्तीची बहुधा दृष्टी जाऊ शकते.
प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपथी (पीडीआर)
हा अत्यंत पुढचा टप्पा असतो. या टप्प्यावर रेटिनामध्ये नव्या, पातळ, कमकुवत रक्तवाहिन्या वाढू लागतात आणि डोळ्यांमधील द्रवही वाढू लागतो. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्याने स्कार टिश्यू तयार होतो. याहून अधिक दृष्टी अधू होऊ नये यासाठी डॉक्टर उपचार करतात. पण दृष्टी गेली तर ती परत आणता येत नाही.
[read_also content=”निधी वाटपातील भेदभाव गंभीर, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी; नाना पटोले यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/discrimination-in-the-allocation-of-funds-is-serious-the-chief-minister-should-clarify-his-role-demand-of-nana-patole-nrdm-281969.html”]
एखाद्या व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपथीचा त्रास होत असेल तर पुढील काही मुद्दे लक्षात ठेवावे –
डायबेटिक रेटिनोपथीची सुरुवात असतानाच मधुमेहींना माहिती दिली पाहिजे. या आजारात लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे तपासणी महत्त्वाची असते.
मधुमेहींची काळजी घेतली पाहिजे
टेलिमेडिसीन किंवा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन फंडस फोटोग्राफीने वार्षिक तपासणी गरजेची आहे.
आधीपासून मधुमेह असलेल्या ज्या महिला गरोदर आहेत किंवा बाळाचे नियोजन करत आहेत, त्यांचे समुपदेशन करावे, जेणेकरून पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकेल.
वयाची 35 वर्षे उलटलेल्या प्रत्येकाने मधुमेहाची चाचणी करून घेतली पाहिजे, मधुमेह असेल तर नियमित रेटिना स्क्रीनची शिफारस करण्यात येते.
रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले तर डायबेटिक रेटिनोपथीची शक्यता खूप कमी होते.