स्तनाच्या कर्करोगावर कसा होतोय जीवनशैलीचा परिणाम
जगभरातील महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या कर्करोग प्रकारांपैकी एक आहे स्तनाचा कर्करोग. हा आजार होण्यामागे जेनेटिक कारणे तर असतातच, शिवाय जीवनशैली कशाप्रकारची आहे ते देखील याचा धोका कमी किंवा जास्त करण्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरते. रोजचा आहार, व्यायाम आणि नियमित तपासण्या याबाबतीत नीट काळजी घेऊन स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येतो. जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करून स्तनाच्या कर्करोगाला आळा घालता येणे शक्य आहे, डॉ. तुषार जाधव, कन्सल्टन्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
योग्य आहार
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात पुरेसा आहार अत्यावश्यक आहे. प्रक्रिया करण्यात आलेले खाद्यपदार्थ, लाल मांस यांचे सेवन कमीत कमी करून आणि ताजी फळे, भाज्या व संपूर्ण धान्ये यांचे रोजच्या आहारातील प्रमाण जास्तीत जास्त ठेवून तुम्ही तुमच्या शरीराला अशी अँटीऑक्सिडंट्स व पोषकद्रव्ये पुरवू शकाल, जी पेशींचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात. हे खाद्यपदार्थ हार्मोन्स लेव्हल नियंत्रित करण्यात मदत करतात, ज्यामुळे कर्करोगजन्य वाढ रोखता येते. ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स यांच्याऐवजी दाणे, बिया आणि ऑलिव्ह तेल यामधील आरोग्याला पूरक फॅट्सची निवड करून तुम्ही एकंदरीत आरोग्य चांगले राखू शकाल.
सक्रिय रहा
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी नियमितपणे शारीरिक हालचाली करत राहणे अत्यावश्यक आहे. एका आठवड्याभरात जवळपास १५० मिनिटे मध्यम व्यायाम करा, यासाठी चालणे, पोहणे किंवा सायकलिंग देखील करता येईल. असे केल्याने हार्मोन्स व्यवस्थित राहतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. व्यायाम केल्याने तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले राहते, शरीरातील सूज, दाह आणि इन्श्युलिन रेसिस्टन्स कमी होतो, आणि कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
भारतात 30 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?
वजन नियंत्रणात ठेवा
रजोनिवृत्तीनंतर स्थूलपणा हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका निर्माण करणारा एक घटक आहे, त्याबरोबरीनेच भरपूर चरबी असलेले टिश्यू एस्ट्रोजेन लेव्हल वाढवतात, त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या हार्मोन-सेन्सिटिव्ह पेशींच्या वाढीला पूरक वातावरण तयार होते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्यासह वजन नियंत्रणात ठेवून हार्मोन लेव्हल स्थिर ठेवण्यात मदत मिळते, शरीरातील सूज आणि दाह कमी होतो, परिणामी कर्करोगाचा धोका कमी होतो.
अल्कोहोल सेवनावर मर्यादा
अल्कोहोल सेवन आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका यांच्यात थेट संबंध असतो. अगदी कमी प्रमाणात जरी अल्कोहोल सेवन केले तरी शरीरात एस्ट्रोजेन लेव्हल वाढतात, त्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो. अल्कोहोल सेवन करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी दर दिवशी फक्त एकच ड्रिंक इतपत मर्यादा घालून घेणे अत्यावश्यक आहे. अल्कोहोलच्या ऐवजी नॉन-अल्कोहोलिक पेये जसे की, हर्बल टी किंवा फ्लेवर्ड वॉटर यांची देखील निवड तुम्ही करू शकता.
धूम्रपान टाळा, तंबाखू सेवन अजिबात करू नका
धुम्रपानामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, स्तनाच्या कर्करोगाचा देखील त्यामध्ये समावेश आहे. प्री-मेनोपॉज टप्प्यामध्ये असलेल्या, धूम्रपान करणाऱ्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त असतो, कारण धुम्रपानामुळे हानिकारक कार्सिनोजेन आणि कार्बनयुक्त कण शरीरात जातात, त्यामुळे डीएनएचे नुकसान होते आणि ट्युमर वाढीला चालना मिळते. धूम्रपान बंद केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो आणि फुफ्फुसे व हृदयाचे आरोग्य सुधारते.
बाळाला दीर्घकाळपर्यंत स्तनपान
संशोधन आणि अभ्यासातून असे आढळून आले आहे की, बाळाला दीर्घकाळपर्यंत स्तनपान करवल्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. स्तनपान करवल्यामुळे हार्मोन्स अड्जस्ट होतात आणि एस्ट्रोजेनचा धोका कमी होतो, परिणामी, हार्मोन-सेन्सिटिव्ह स्तनाच्या कर्करोगाची वाढ रोखली जाऊ शकते. एखादी महिला सहा महिन्यांहून जास्त काळपर्यंत स्तनपान करवू शकत असेल तर तिला अजून जास्त लाभ मिळू शकतील.
तुमच्या खाण्याच्या पाकिटात लपलंय ब्रेस्ट कॅन्सरचं विष, दचकलात? शोधात सापडले जीवघेणे सत्य
हार्मोन थेरपीच्या बाबतीत सावध रहा
रजोनिवृत्तीवरील उपचार म्हणून सुचवली जाणारी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकते. कम्बाइन्ड एस्ट्रोजेन-प्रोगेस्टेरॉन थेरपी हार्मोन लेव्हल वाढवते, त्यामुळे कर्करोगाच्या वाढीला चालना मिळू शकते. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करवून घेत असलेल्या महिलांनी आपल्या डॉक्टरांसोबत इतर पर्यायांविषयी चर्चा केली पाहिजे किंवा अत्यावश्यक असेल तरच कमीत कमी काळासाठी कमीत कमी डोस घ्यावा.
नियमितपणे तपासणी करून घ्यावी
आजार लवकरात लवकर लक्षात येणे खूप महत्त्वाचे आहे. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. स्वतः स्वतःची तपासणी करून, क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि मॅमोग्राम करून, डॉक्टरांना स्तनामध्ये काही असामान्य बदल, वाढ होत असल्यास खूप आधीच लक्षात येऊ शकते आणि उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राम करून घ्यावा आणि ४० पेक्षा कमी वयाच्या महिलांनी स्तनांमध्ये काही असामान्य बदल होत आहेत का याची स्वतःच नियमितपणे तपासणी करत राहावी.
गंभीर समस्या
स्तनाचा कर्करोग ही संपूर्ण जगभरातील एक गंभीर आरोग्य समस्या आहे पण जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल, निवड करून या आजाराचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी करणे सहजशक्य आहे. संतुलित आहार घेणे, शारीरिक व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि तंबाखू, अतिरिक्त अल्कोहोल सेवन टाळणे हे सर्व करून तुम्ही आजाराला प्रतिबंध घालू शकता.
स्तनपान करवणे, हार्मोन थेरपी व्यवस्थापित करून आणि मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे तपासणी करून आजार लवकरात लवकर लक्षात येऊ शकतो, परिणामी धोका कमी होऊ शकतो. या सर्व आरोग्यदायी सवयींचा अवलंब करून महिला स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक व सक्रिय होऊन स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळू शकतात.