Top Marathi News Today Live
01 Jul 2026 09:27 AM (IST)
भारतात 1 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,205 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,021 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,654 रुपये आहे. भारतात 1 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,050 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,06,540 रुपये आहे. भारतात 1 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.
01 Jul 2026 09:10 AM (IST)
Pune , Sangali : सांगलीच्या खणाभाग येथील रहिवासी असलेला आणि पुण्यात नोकरी करून कुटुंबाला हातभार लावणारा १९ वर्षीय तरुण दुर्वांक शेवाळे याने मानसिक तणावातून राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकुलता एक असलेल्या दुर्वांकचे पुण्यात काम करत असताना एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले होते, मात्र धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नात अडचण निर्माण झाली. संबंधित मुस्लिम तरुणीने लग्नासाठी घातलेल्या एका अटीमुळे प्रचंड मानसिक धक्क्याखाली आलेल्या आणि पूर्णपणे खचून गेलेल्या दुर्वांकने अखेर टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले, ज्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
01 Jul 2026 09:00 AM (IST)
Commercial LPG Price Update: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल वितरण कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल १८३.५० रुपयांची लक्षणीय कपात केली आहे. या दरवाढीनंतर व्यावसायिक सिलेंडरची किंमत पूर्वीच्या ३,११३.५० रुपयांवरून आता २,९३० रुपयांवर आली असून, चालू वर्षात या सिलेंडरच्या किमती कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे; तर दुसरीकडे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे हॉटेलचालक आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशालाही काहीसा आराम मिळणार आहे.
01 Jul 2026 08:59 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांवर टीका केली आहे. मंदिराच्या हुंडीत जमा होणाऱ्या देणग्या, दागिने आणि निधीच्या व्यवस्थापनात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वाचा सविस्तर-
01 Jul 2026 08:55 AM (IST)
BJP Internal Conflict : भारतीय जनता पक्षात अंतर्गत आलबेल नसून वाद उफाळून येण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी वर्तवल्यानंतर, अवघ्या एकाच दिवसात भाजपमधील अंतर्गत संघर्षाचे चित्र समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नव्या शहराध्यक्षांच्या नियुक्तीवरून सध्या येथील राजकारण कमालीचे तापले असून, पक्षांतर्गत कटकारस्थाने आणि शह-काटशहाचे राजकारण उघडपणे चव्हाट्यावर आले आहे. ठाकरेंनी उपस्थित केलेल्या राजकीय शक्यतेला या घडामोडींमुळे बळ मिळाले असून, या नव्या नियुक्तीवरून पक्षातील स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि गटबाजी आता उघड झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
01 Jul 2026 08:50 AM (IST)
नाशिक: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रक्रियेला आता मोठी गती आली आहे. या संवेदनशील प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून, विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंत तब्बल १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी अशोक खरात याच्याविरोधात सध्या एकूण १९ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे ८ गुन्हे आणि उर्वरित आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
01 Jul 2026 08:45 AM (IST)
Monsoon Orange Alert: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून ते ४ जुलैपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या आठवड्यात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर लक्षणीय वाढणार असून, वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारच्या दरम्यान अत्यंत तीव्र पावसाची (अतिवृष्टी) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना पूर्ण सतर्क राहण्याचे तसेच अत्यंत आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Monsoon: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने आता जोरदार हजेरी लावली असून, गेल्या काही तासांपासून शहराच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंडसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. इस्टर्न फ्रीवेवरील दृश्ये पावसाची तीव्रता स्पष्ट करत असून, रस्ते वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.






