संग्रहित फोटो
पंढरपूर : आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2023) डायल 108 च्या एकूण 75 अॅम्ब्युलन्स कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी (कंट्रोल रुम) पुण्याच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. त्याद्वारे पंढरपुरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत सेवा दिली गेली. मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम वारंवार येत असल्यामुळे यावर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपुरात अद्ययावत असणारी कंट्रोल रुम, वॉकीटॉकी सुविधा, जिओ मॅपिंग या सर्व गोष्टींमुळे 108 अॅम्ब्युलन्स वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.
आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या 847 रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या 19 हजार 06 रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण 19 हजार 853 रुग्णांनी 108 या मोफत अॅम्ब्युलन्स सेवा देण्यात आली. महाआरोग्य शिबिरातील अति गंभीर अशा 82 व किरकोळ 1 हजार 567 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. एकूण 21 हजार 312 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली आहे.
आषाढी यात्रेचा सांगता समारोप 3 जुलैला प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला.