
Maharashtra Breaking News Updates Today:
12 Jun 2026 11:10 AM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामने अॅपल वॉचसाठी एक संपूर्ण नेटिव्ह ॲप लाँच केले आहे. हे ॲप अॅपलच्या वियरेबल डिव्हाईसवर मेसेजिंग फीचर्सचा एक संपूर्ण सेट ऑफर करतो. या रिलीझमुळे अनेक वर्षांनंतर या प्लॅटफॉर्मचे वॉचओएसवर पुनरागमन झाले आहे, कारण कंपनीने आपले अधिकृत स्मार्टवॉच ॲप्लिकेशन बऱ्याच काळापूर्वी बंद केले होते. या नव्या ॲपमुळे यूजर्स आता थेट त्यांच्या मनगटावरून कन्वर्सेशन्स अॅक्सेस करू शकणार आहेत, मेसेज पाठवू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत.
12 Jun 2026 11:05 AM (IST)
पश्चिम बंगालमधील दारूण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील असाच एक मोठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
12 Jun 2026 10:57 AM (IST)
अक्षय कुमारला त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने कोणताही संकोच न बाळगता मनमोकळेपणाने सांगितले, “कधीकधी मला निवृत्त व्हावेसे वाटते. पहाटे ४ वाजता जाग आल्यावर हा विचार मनात येतो. पण पाच सेकंदांनंतर मला आठवते की मला शूटिंगवर जायचे आहे, जिथे ३०० लोक माझी वाट पाहत आहेत. मग मी स्वतःला सांगतो की निवृत्तीचा विचार दुसऱ्या दिवशी करेन.” असे करत ३६ वर्षे झाली आहेत.
12 Jun 2026 10:47 AM (IST)
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयावर कोणतीही सुनावणी घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन गुरुवारी पहाटे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हजर झाल्या. आपल्या याचिकेत नटराजन यांनी ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याचे कारण देत निकाल जाहीर करण्यावर स्थगिती देण्याची विनंती केली.
12 Jun 2026 10:37 AM (IST)
कंपनी टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनचे नाव Pova 8 असे आहे. कंपनीने सादर केलेला नवा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Pova 7 चा सक्सेसर आहे. नव्या Pova 8 स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत.
12 Jun 2026 10:27 AM (IST)
भारतात 12 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,563 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,349 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,922 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,220 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.
12 Jun 2026 10:17 AM (IST)
शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांना ठार मारण्यासाठी आलेल्या संशयितांनी ते हाती न लागल्याने त्यांच्या अवघ्या १४ वर्षीय नातवावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे सांगली शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
12 Jun 2026 10:07 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे ज्या शताब्दी एक्सप्रेसने जात होते, त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लास ई-१ बोगीतून ते प्रवास करत होते. ही ट्रेन माखनपूर-फिरोजाबाद दरम्यान जात होती. त्यादरम्यानच डब्यावर अचानक दगडफेक झाली. दगड थेट आरएसएस प्रमुख प्रवास करत असलेल्या डब्यावर आदळला, ज्यामुळे खिडकीची काच फुटली.
12 Jun 2026 09:57 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
12 Jun 2026 09:47 AM (IST)
दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची, जीवनवाहिनी असलेल्या आणि ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित एसटी महामंडळ अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असल्याने ती वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. या लढ्याचे नेतृत्व परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः करावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले.
12 Jun 2026 09:37 AM (IST)
वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराणमधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले होते. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी संघर्ष संपुष्टात येणार असल्याचा दावा केला आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीही पुन्हा सुरु होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
12 Jun 2026 09:05 AM (IST)
Monsoon Alert: देशात यंदा मॉन्सूनचा पाऊस रेंगाळला असल्यामुळे चिंतेचे वातावरण असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) एक अत्यंत मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. पुढील १० तास देशातील १५ राज्यांसाठी अत्यंत धोक्याचे असणार असून, या भागात ताशी ९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
12 Jun 2026 08:59 AM (IST)
Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिली आहे. "आतापर्यंत जे काही घडलं ते मी समजून घेतलं, पण यापुढे जर पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल, तर त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल," अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत सुनेत्रा पवारांनी पक्षांतर्गत नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई/नवी दिल्ली देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.