जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात कसा मिळेल यामुळे सतत प्रयत्न होत असल्याचे सातत्याने पाहायला मिळते. अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेची अडचण दूर व्हावी व त्यांना शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी सोलार प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम हाती घेतले. शनिवारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील साकत येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला.
साकत येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता 3.1MW एवढी आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत EESL, टाटा सोलर पावर व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेला हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पाची एकूण किंमत ही 13.02 कोटी रुपये एवढी आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोलार प्रकल्पाची विविध 150 कोटींहून अधिकची कामे मतदारसंघात मंजूर असून त्यापैकी बरीचशी कामे ही पूर्ण देखील झाली आहेत. शेतकऱ्यांची सोय व्हावी व पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी विजेची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार पवारांनी सोलार प्रकल्पाची उभारणी केल्याने आता त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
[read_also content=”मीडियाला माहित होतं, मग पोलीस काय करत होते?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/the-media-knew-then-what-the-police-were-doing-question-by-devendra-fadnavis-nrdm-266455.html”]
साकत येथील या सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा साकत वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी, नानेवाडी व मोहा या गावातील एकूण 1207 वीज ग्राहक शेतकऱ्यांना होणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी आता दिवसा पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.