मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2 लाख 52 हजार कोटींची घोषणा केली. रेल्वेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 15,554 कोटी रुपये आले आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधला. रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी तरतूद झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यापासून सर्व कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. 2009 ते 2014 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला 1 हजार 171 कोटी रुपये दिले जात होते. ‘वन प्रॉडक्ट-वन स्टेशन’ योजनेअंतर्गत 116 स्टॉल्स सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या एका वर्षात 397 किलोमीटरचे नवे रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत. तसेच विद्युतीकरणाची 98 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
अमृत भारत योजनेअंतर्गत 126 स्थानकांच्या विकासाची कामे सुरु आहेत. 816 अंडरपास आणि ओव्हर ब्रिजचे काम करण्यात आले आहे. राज्याला रेल्वेसाठी 15,554 कोटी आले आहेत.