लेक लाडकी योजना (फोटो- istockphoto)
‘लेक लाडकीचा’ २.८९६ बालिकांना लाभ
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये
बालकल्याण विभागाची महत्वाकांक्षी योजना
गुहागर: जिल्ह्यात २ हजार ८९६ बालिकांना ‘लेक लाडकी’ या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम लाभाथ्यर्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. लेक लाडकी योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
ही योजना ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते. शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणे, कुपोषण कमी करणे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा योजनेचा उद्देश आहे.
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये
पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, दुसरा हप्ता इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, तिसरा हप्ता सहावीमध्ये सात हजार रुपये, चौथा हप्ता अकरावीत ८ हजार ३३ रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ८९६ बालिकांना लेक लाडकी या योनजेचा लाभदेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाकडून सुमारे दीड कोटीचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाना चांगलाच दिलासा मिळाला आहे.






