गोंदिया : चालू महिन्यात मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने (District Agricultural Officer Offices) तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४ हजार ९२१ शेतकऱ्यांच्या २२२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) तयार केला.
जून महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी पाऊस होतो की नाही, अशी हुरहूर शेतकऱ्यांना लागून होती. हवामान विभागाचा अंदाज देखील खोटा ठरू लागला होता. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. जुलै महिन्यात पावसाने दमदार कमबॅक केला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. ऊन तापत असल्यामुळे पेरणी झालेल्या बांधांमध्ये भेगा पडणे सुरू झाले होते. अशात हवामान खात्याने (Department of Meteorology) ९ तारखेपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला.
९ ऑगस्ट मंगळवारी दिवसा आणि रात्रभर तसेच बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. जिल्हा जलमग्न झाला. नदी आणि नाल्यांतील पाण्याचा पूर शेतात शिरला. त्यामुळे शेतात लावलेले रोवणे आणि पऱ्हे पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले. तर काही ठिकाणचे पऱ्हे आणि रोवणे कुजले. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
महसूल विभाग (Department of Revenue ) आणि कृषी विभागाने जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ३६४ गावांतील ४ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या २२२५ हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नुकसानाचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचून आहे. त्यामुळे त्या भागातील धान पिक आणि भाजीपाला देखील कुजले. शिवारात कुजका वास सुटला आहे.
जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे शिवार जलमय झाले होते. पुराचे पाणी शेतात शिरल्याने नुकत्याच झालेल्या रोवणीचे धान देखील पाण्यासोबत वाहून गेले. या दोन दिवसांत झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्याला (Tiroda taluka) बसला आहे. तब्बल ११९ गावांतील १३६५ हेक्टर क्षेत्रातील धान आणि भाजिपाला पिकांचे नुकसान झाले. हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पावसाचे पाणी शेतात शिरले. नद्या आणि नाल्यांच्या काठावरील शेतात पाणी अद्यापही साचून आहे. रात्रंदिवस आलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील शेती खरडून निघाली आहे. तर काही भागांतील धुरे वाहून गेले आहेत. अनेक तलाव देखील फुटल्याने तलावांचे पाणी देखील शेतात शिरले. सर्व बाजुने नुकसानाचे सर्व्हेक्षण (Damage Survey) झाल्यानंतर हाती येणारा नुकसानाचा आकडा मोठा होणार आहे.