पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे ३५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णत्वाची अपेक्षा
पिंपरी : स्वारगेट ते पीएमसीएमसी या मेट्रो मार्गाचा विस्तार असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या पिंपरी-निगडी मेट्रो प्रकल्पाच्या कामात आता गती आली असून सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रो प्रशासनाने ठेवले आहे. या मार्गामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक परिसराला पुण्याशी थेट मेट्रोद्वारे जोडणी मिळणार असून, प्रवासाचा वेळ तब्बल ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ९१० कोटी १८ लाख रुपये इतका आहे, अशी माहिती महामेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.
या विस्तारित मार्गाची एकूण लांबी ४.५१ किलोमीटर असून तो चार टप्प्यांत विभागला गेला आहे. पीएमसीएमसी ते चिंचवड (१.४६३ किमी), चिंचवड ते आकुर्डी (१.६५१ किमी), आकुर्डी ते निगडी (१.०६२ किमी) आणि निगडी ते भक्ती-शक्ती चौक (०.९७५ किमी). हा पूर्णपणे इलेव्हेटेड (उंचावर बांधलेला) मार्ग जुन्या मुंबई–पुणे महामार्गाच्या मध्यभागी उभारला जात आहे.
या विस्तारित मार्गावर चिंचवड, खंडोबा माळ चौक (आकुर्डी), टिळक चौक (निगडी) आणि भक्ती-शक्ती चौक अशी चार स्थानके बांधली जात आहेत. चिंचवड स्थानक औद्योगिक व शैक्षणिक परिसरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, तर भक्ती-शक्ती स्थानकामुळे देहू, तळेगाव, वडगाव व चिखलीसारख्या उपनगरांतील प्रवाशांना मेट्रोची थेट सुविधा मिळणार आहे. या स्थानकांना पीएमपी बस, रेल्वे आणि ऑटोरिक्षा सेवांशी जोडल्याने वाहतूक सुसंवाद वाढून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
परवानग्या पूर्ण, काम वेगाने सुरू
ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील १४ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूमी अधिग्रहण आणि विविध परवानग्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, महापालिका, एमआयडीसी आणि खासगी मालकांसोबतची चर्चा यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे.
पिलर आणि सेगमेंट्सची प्रगती
या मार्गासाठी एकूण १५१ पिलर उभारले जाणार असून, आतापर्यंत ६० हून अधिक पिलर आणि ७८ फाउंडेशन व पिलर कॅप्सचे काम पूर्ण झाले आहे. निगडी–चिंचवड विभागात कामाला प्राधान्य देण्यात आले असून, सर्व पिलर भूकंपरोधक तंत्रज्ञानाने बांधले जात आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गाची रचना अधिक मजबूत आणि सुरक्षित राहणार आहे.
दरम्यान, प्रकल्पासाठी एकूण १३३७ सेगमेंट्स तयार करण्यात येणार असून, त्यापैकी ५१७ सेगमेंट्सचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरपासून निगडी–चिंचवड परिसरात सेगमेंट उभारणी सुरू झाली असून, प्रीकास्ट यार्डमध्ये उत्पादन वेगाने सुरू आहे. खंडोबा माळ चौकात पहिला सेगमेंट लाँचिंग गर्डर बसवून प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात झाली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “सध्या ३५ टक्के स्थापत्यविषयक काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला गती देण्यात आली आहे.”






