नांदेडचे 5 विद्यार्थी सापडले होते रोहित आर्यच्या तावडीत, पुढे जे घडलं...
मुंबई म्हणजे मायानगरी आणि सिनेसृष्टीचे केंद्रस्थान. कित्येक मोठमोठ्या अभिनेत्यांनी मुंबई आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून यशाचे उत्तुंग शिखर गाठले. मुंबईत नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटांचे शूटिंग होत असते, ज्यात देशभरातून आलेले कलाकार काम करत असतात. अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत असतात. मात्र, नुकतेच मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या 17 मुलांमध्ये नांदेडच्या मुलांचा देखील समावेश होता.
ग्लॅमरच्या झगमगाटात स्वप्न रंगवणाऱ्या नांदेडच्या पाच विद्यार्थ्यांना मुंबईत भयकथेचा सामना करावा लागला. पवईतील आर. ए. स्टुडिओ येथे ‘हॉरर फिल्म’च्या नावाखाली घडलेल्या प्रसंगाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ‘सिस्टिमविरोधी भयपट’ बनवण्याच्या नावाखाली कास्टिंग डायरेक्टर रोहित आर्याने तब्बल ८०० तरुणांना बोलावले.
त्यातील 17 जणांची निवड झाली, आणि त्यात नांदेडच्या ऑक्सफर्ड सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल, वाडी (बु.) येथील पाच विद्यार्थ्यांचाही समावेश होता, चार दिवसांच्या प्रशिक्षणाचा बहाणा करून या मुलांना स्टुडिओच्या वरच्या मजल्यावर डांबून ठेवण्यात आले, तर त्यांच्या पालकांनाही खाली “सीन”च्या नावाखाली थांबवण्यात आले. या सगळ्याचे चित्रीकरण सुरू असताना कोणी कल्पनाही केली नाही की हा सीन नव्हे, तर खऱ्या भयपटाचा आरंभ आहे. रोहित आर्यने या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच महाराष्ट्र हादरला.मात्र, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित आर्यचा एन्काऊंटर केला.
Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
काही विद्यार्थी पालकांसोबत सुखरूप परतले, तर काही अजूनही पोलिसांच्या देखरेखीखाली आहेत. या घटनेने सर्व पालकांना एकच प्रश्न विचारायला भाग पाडला, “कलेच्या मोहात, जोखमीची चाहूल कोण ओळखणार?” स्वप्नांच्या मागे धावत गेलेले हे विद्यार्थी भयाच्या सावटातून परतले आहे.सुदैवाने, नांदेडमधील सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.






