कर्जत : मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता अनेक ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला व विविध रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव डाकू ते बिटकेवाडी या रस्त्याचे भूमिपूजन मिरजगाव येथे पार पडले.
या रस्त्याची एकूण लांबी ही ५६ किमी असून एकूण ६५ कोटी रुपये खर्चून हा प्रलंबित रस्ता बनवण्यात येणार आहे. निमगाव डाकू ते मलठण, तरडगाव, निंबोडी, सीतपुर, नागापूर, नागलवाडी, मिरजगाव, गुरवपिंप्री, चांदे व बिटकेवाडी या गावातून संबंधित मार्ग जाणार असून परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मिरजगाव ते बिटकेवाडी दरम्यान हा मार्ग ५ मीटर रुंद असणार असून निमगाव डाकू ते मिरजगाव ३.७५ मीटर एवढी रुंदी असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते पण आता त्यांची समस्या कायमची दूर होणार आहे.
यासोबतच गोंदर्डी ते थिटेवाडी या ४ किमीच्या रस्त्याचेही काम मार्गी लागणार असून २ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्याचे देखील भूमिपूजन मतदारसंघांच्या दौऱ्यावर असताना आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दुचाकीवरून जाणे देखील अवघड होते अशा रस्त्याचे काम आ. रोहित पवार यांनी हाती घेतले आहे. यासोबतच खांडवी- भोसे-कुळधरण मार्गे बारडगाव जाणाऱ्या ४५ कोटींच्या रस्त्याचे काम देखील सध्या प्रगतीपथावर असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन हा रस्ता नागरिकांसाठी सुरू होणार आहे. असेच अनेक प्रलंबित राज्य महामार्ग व अंतर्गत रस्ते यांची कामे रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मार्गी लागत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे.
[read_also content=”बेकायदेशीर वृक्षतोडीनंतर लाकडे गायब करणाऱ्या सुपरवायझरला दणका… https://www.navarashtra.com/maharashtra/supervisor-who-disappears-timber-after-illegal-logging-nrdm-304514.html”]
माती स्थिरीकरण तंत्रज्ञानाचा केला जाणार वापर
माती स्थिरीकरण (Soil Stabilization) या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सीना नदी काठी असणाऱ्या ९ किलोमीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काळया मातीमुळे खचून जाणारे रस्ते व रस्त्यांची होणारी चाळण दूर होण्यास मदत होते व काळया मातीची वहन क्षमता वाढून रस्ते आणखी मजबूत होतात. तालुक्यात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.