छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ उत्पादनांना आता जागतिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. देवगिरी हापूस (Devgiri Hapus), पैठणीप्रमाणेच (Paithani) आता या उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळणार आहे. यात कुंथलगिरीचे पेढे, दगडी ज्वारी, तुळजाभवानीच्या कवड्यांची माळ, रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे. या आठही वस्तूंना भौगौलिक मान्यता मिळणार असल्याचं पत्र जिओग्राफिकल इंडिकेशन कार्यालयाकडून मिळालेलं आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतच पत्र उत्पादकांना देण्यात आलेलं आहे.
कोणत्या आठ उत्पादनांना होणार लाभ?
1. जालन्यातील दगडी ज्वारी
2. धाराशीवचा कुंथलगिरी पेढा
3. नांदेड रेणुका मातेचा तांबूल
4. लातूर पानचिंच
5. लातूर बोरसरी डाळ
6. लातूर कास्ती कोथिंबिर
7. धाराशीव तुळजाभवानीची कवड्यांची माळ
8. मुरुड अडकित्ता
जीआय तज्ज्ञांनी काय दिली माहिती?
गेल्यावर्षी 18 प्रस्ताव आले होते. तपासणीनंतर त्यातील मराठवाड्यातील 8 उत्पादनांना जीआय मानांकन मिळणार आहे. काही दिवसांत याचं अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल. यामुळे मान्यतेनुसार वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जीआय टॅग असणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बनावट मालाला आळा बसेल, अशी माहिती जीआय तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी दिलीय.