शिक्षण विभाग 'अॅक्शन मोड'वर; रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी 818 शाळांची झडती; (Photo Credit - X)
रत्नागिरी : जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची ‘पटपडताळणी’ मोहिम एकाच वेळी हाती घेण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ८१८ शाळांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. विद्यार्थी संख्येचा आकडा फुगवून सांगणाऱ्या शाळांवर नियंत्रण मिळवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने ही मोहीम अत्यंत गोपनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. सकाळी ८ ते १२ या वेळेत शिक्षण विभाग, ‘डाएट’चे अधिकारी, समग्र शिक्षण व योजना विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनी विविध शाळांना भेटी दिल्या. राज्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पहिल्या दिवशी माहिती ऑनलाइन भरता आली नाही. त्यामुळे ६५१ शाळांची माहिती ऑफलाइन पद्धतीने नोंदवण्यात आली, तर १६७ शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मोजणी करून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याचे छायाचित्रही काढण्यात आले आहे, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही तपासणी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून तीन टप्प्यांत होणार आहे. १५ एप्रिल रोजी ९०० शाळा, २२ एप्रिल ९२६ शाळा अशा एकूण २६२६ शाळा तपासल्या जाणार आहेत.
गैरहजर विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे नोंद
अनेकदा शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्येची आकडेवारी फुगवून सांगितली जाते. हा ‘आकडेवारीचा खेळ’ थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन हजेरी घेण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी गैरहजर आढळले आहेत, त्यांची नोंद स्वतंत्रपणे लॉगिनमध्ये करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या पेपरच्या दिवशीच पडताळणी
विशेष म्हणजे, ही पटपडताळणी महत्त्वाच्या विषयांच्या पेपरच्या दिवशीच आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांची वार्षिक परीक्षा.
अतिरिक्त कामाचा कर्मचाऱ्यांवर ताण
महाविद्यालयीन स्तरावर २०१३ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन डॉ. गजानन सानप यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत.






