बार्शी : बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील व विस्तारित भागातील अंतर्गत रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सर्व समाजाच्या स्मशानभूमी सुधारणा, समाज मंदिरांचे सभागृह, तसेच बार्शी शहरात उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात शासकीय विहिरी मधून पाणी पुरवठा करण्यासंबंधीची योजना, घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना अशा अनेक योजनेतून हजारो कोटींचा निधी बार्शी शहरात प्राप्त झाला.
ही विकास कामे होत असताना बार्शी शहरासाठी महत्त्वकांक्षी असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत ८९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी बार्शी शहरासाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार राऊत यांनी मुंबईतून दिली. यामध्ये बार्शी शहरातील विविध प्रमुख अकरा रस्त्यांचा समावेश आहे.
या योजनेस मंजुरी मिळून निधी उपलब्ध होण्यासाठी गेली अडीच वर्षांपासून आमदार राजेंद्र राऊत प्रयत्न करीत होते, परंतु बार्शीतील काही नेते यास विरोध करून अडचण निर्माण करीत होते. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. याबाबत आमदार राऊत यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेत माहिती देऊन विरोधकांना या कामात खोडा न घालण्याची विनंती केली होती. ही महत्वकांक्षी योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शीकर जनतेच्या वतीने आमदार राऊत यांनी आभार मानले.