मुंबई : संततधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरणातील पाणीसाठा (Water Reservoir) पुन्हा एकदा वाढत आहे. तसेच, धरणे (Dam) ९० टक्के भरली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस (Rain In Dam Area) वाढल्याने स्थिरावलेली पाणी पातळी थोडी वाढली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा (Tansa), मध्य वैतरणा, भातसा (Bhatsa), विहार, तुळशी (Tulshi) अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या ९०.०१ टक्के आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. तरी दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात अजूनही १० टक्के तूट आहे.
शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक २९.७२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर भागात ७.१९ मिमी, पूर्व उपनगरात ८.५४ मिमी पाऊस पडला.