पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्ज विक्रीची चर्चा सगळीकडे सुरु होती. असे असताना आता शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण उजेडात आले आहे. पुणे पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागात छापेमारीची कारवाई करत तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 4 कोटींचा अमली पदार्थांचा साठाही जप्त केला आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रकाशात आल्यानंतर त्याला मदत करणारे त्याचे मित्र आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली होती. याच प्रकरणातून काही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली गेली. ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याला मदत करणाऱ्या दोन पोलिसांना अटकही करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यानंतर आता आणखी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4 कोटी रूपये मूल्याचे 2 किलो 300 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ (एमडी) जप्त करण्यात आले. पुण्यात एका नायजेरियन तरुणाने हे ड्रग्ज पुरावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.