Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरून बैठांकावर बैठका होत असलेल्या पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्याशी चर्चा करून महायुतीसोबत जाणाऱ्या महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत महायुतीकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकीय चिखल झालेला पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मोठी खलबत सुरू आहेत. शरद पवार यांनी माढ्यातून महादेव जानकरांना जागा सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतआता महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता महादेव जानकरांचे उमेदवारी महायुतीकडून जाहीर करण्यात आली आहे. रासपचे प्रमुख महादेव जानकर हे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक होते.
जानकरांनी महायुतीकडे त्यांनी दोन जागांची मागणी केली होती मात्र महायुतीकडून त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. त्यामुळे महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेत महायुतीला धक्का दिला होता. जानकर यांचा हा बाण महायुतीला वर्मी लागला अखेर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या कोठ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महादेव जानकरांना परभणीतून उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा केली आहे. परभणीमध्ये जानकर यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. महायुतीपासून मी कधीही दूर गेलो नाही. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद तिथे आमच्यासोबत आहे. परभणीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कसा विकास होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं महादेव जानकर म्हणाले.