पिंपरी : बनावट सही द्वारे केलेले ऍग्रीमेंट रद्द करण्यासाठी दाम्पत्याने महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार मार्च २०२१ ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला. संतोष भीमराव पारवे पाटील (वय ४२, रा. दापोडी) आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फसवणूक व पैसे उकळण्याच्या उद्देशाने ते स्वतः डॉक्टर असल्याचा बनाव केला. त्यांचे नोंदणीकृत हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट असल्याची खोटी माहिती के एल इ युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट या संस्थेला दिली. संस्थेचा विश्वास संपादन करून संस्थेसोबत ऍग्रीमेंट केले. आरोपींनी फसवणुकीच्या इराद्याने सप्लिमेंटरी ऍग्रीमेंट बनवून त्यावर फिर्यादी, संस्थेचे रजिस्ट्रार व्ही ए कोटीवाले आणि डॉ. व्ही डी पाटील यांची बनावट सही करून फिर्यादी यांच्या संस्थेची फसवणूक केली. बनावट सहीद्वारे केलेले ऍग्रीमेंट रद्द करण्यासाठी आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.