मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात एक एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०५(२), ३७(१), १३५, ५०० अंतर्गत तक्रार नोंदवली आहे.
कंबोज यांनी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, विद्या चव्हाण यांनी २७ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट २०२२ रोजी द्वेषपूर्ण वक्तव्य केले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे दोन गटांमध्ये वैर निर्माण होऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आपल्या पहिल्या वक्तव्यात म्हटले होते की, मोहित कंबोज असतील किंवा किरीट सोमया असेल यांना गुजरातमध्ये पाठवून द्. त्यांचे महाराष्ट्रात काहीही काम नाही. त्यांनी गुजरात मध्ये जावे. इथे चौकशा करू नये. गुजरातमध्ये अनेकांचा मोठमोठ्या डायमंडचा व्यापार आहे. उद्योग, धंदे आहेत. त्यांची चौकशी करावीत. महाराष्ट्रात आम्ही लोक आहेत. चौकशी करू, काय करायचे आहे ते करू. चव्हाण पुढे म्हणाल्या की, अमित शाहसारखे गृहमंत्री आहेत. तो किरीट सोमया सारख्यांचे ऐकतो. लोकांच्या चौकशा लावणे आणि गुन्हेगारांना तिकडे बसून मंत्रिपद देणे हे मोदी सरकारचे काम आहे.