पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद घातला असून, दोन दिवसात चार फ्लॅट फोडत लाखोंवर डल्ला मारला आहे. चार घटनांमधून तब्बल 15 लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. या घटना लष्कर, कोंढवा, भारती विद्यापीठ परिसरात घडल्या आहेत.
पहिली घटना कोंढव्यात घडली असून, चोरट्यांनी मद्य विक्री दुकनावर डल्ला मारला. गल्ल्यातील 1 लाख 87 हजार रुपयांची रोकड तसेच मद्याच्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे चोरून नेले. याबाबत सचिन ढवण (वय 47, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
ढवण मद्य विक्री दुकानात व्यवस्थापक आहेत. साळुंके विहार रस्त्यावरील अलाइड हाईट्स इमारतीत अर्चना लिकर वाइन शॉप आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटला. गल्ल्यातील 1 लाख 87 हजार रुपये, तसेच मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे असा 2 लाख 92 हजार 980 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी 4 लाख 83 हजारांचे दागिने चोरीला गेल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार कात्रजमधील श्रीराम दर्शन सोसायटीत राहतात. फ्लॅटचे कुलुप बनावट चावीने उघडून कपाटातील 4 लाख 83 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला नेले. मोलकरीनीने ही चोरी केल्याचे तक्रारदारांनी फिर्यादित म्हंटले आहे. पोलीस कर्मचारी गोरे तपास करत आहेत.
तिसरी घटना लष्कर भागातील मोलेदीन रोडवर घडली असून, भरदुपारी चोरट्यांनी फ्लॅट फोडून तब्बल 5 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांत 65 वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. ही घटना सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत घडली आहे. तक्रारादारांचा एका बहुमजली सोसायटीत फ्लॅट असून, ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून चोरी केली.
तसेच, चौथी घटना कोंढवा बुद्रुक येथे घडली असून, चोरट्यांनी फ्लॅट फोडून 2 लाख 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत विशाल कामठे (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.