सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : पुणे शहरातील राजभवनात पंतप्रधानांसाठी ‘वाडा’ संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले नवे निवासस्थान बांधण्यात येणार आहे. राजभवन जवळून गेलेल्या हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या जमिनीवरील मार्गिकेमुळे पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या सुरक्षेला बाधा निर्माण होण्याची शक्यता केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने नवीन संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव लवकरच राजभवनला सादर केला जाणार आहे.
‘पीएमआरडीए’च्या वतीने मेट्रोच्या हिंजवडी -शिवाजीनगर या मार्गिकेचे काम सुरु आहे. या मार्गिकेवरून जेव्हा प्रवासी वाहतूक सुरु होईल तेव्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन सध्या अस्तित्वात असलेले पंतप्रधान यांच्यासाठीचे राखीव निवासस्थान पाडण्यात येईल. तसेच सुरक्षित जागी नवे निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील नामांकित वास्तुविशारदांकडून आरेखन मागविण्यात आले असून पुढच्या आठवड्यात ते राजभवन प्रशासनाला सादर देखील केले जाणार आहे. सुमारे आठ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर नवे निवासस्थान असणार आहे. पुणे शहराचे वैशिष्ठ्य लक्षात घेऊन हे वास्तु आरेखन तयार करण्यात येणार आहे.
राजभवन प्रशासनाला प्रस्ताव पाठविला जाणार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, राजभवनात पंतप्रधानांसाठी नवे निवासस्थान बांधले जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, राजभवन प्रशासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यांनी वास्तुच्या आरेखनाची निवड केल्यानंतरच कामाला सुरुवात होईल.
मार्गिकेमुळे सुरक्षेला धोका
हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोची उन्नत मार्गिका ही राजभवनाच्या जवळून जाते. मेट्रोची सेवा सुरु झाल्यानंतर या मार्गिकेवर प्रवाशांची वाहतूक सुरु होईल. हे लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी व पोलिसांनी देखील पंतप्रधान यांचे निवासस्थान बदलण्याच्या सूचना दिल्या. परिणामी आता नवीन निवासस्थान बांधले जाणार आहे. निवास स्थानाचा खर्च ‘पीएमआरडीए’ करणार आहे.