Mumbai News: कूपरमध्ये जैविक कचऱ्याचा खच! मनुष्यबळ, कंत्राटी वादांचा फटका थेट आरोग्य व्यवस्थेला
एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे मुंबईतील कूपर रुग्णालयात पुन्हा जैव वैद्यकीय कचऱ्याचा खच पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच मुद्द्यावरून गेल्या वर्षी नोटीस मिळाल्यानंतरही परिस्थितीत ठोस बदल न झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयातील कचऱ्याचे डबे ओसंडून वाहत असून, अनेक ठिकाणी धोकादायक बायोमेडिकल कचरा उघड्यावर पडून असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरात झुरळांचा उपद्रव वाढला असून, रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची अस्वच्छता संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते.(फोटो सौजन्य – AI)
रुग्णालय प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात मनुष्यबळाची कमतरता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न यामुळे कामकाज ठप्प होत असल्याचे दिसून येते. कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यातील वादाचा फटका थेट स्वच्छतेवर पडत आहे. अधिष्ठात्री डॉ. छाया शिंदे यांनी कचरा लवकरच साफ करण्यात येईल, असे सांगितले असले तरी, वारंवार उघड होणाऱ्या अशा घटनांमुळे तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षीच प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस देण्यात आली होती. हा जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होते असून सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता, परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे अशीच आहे.कूपर रुग्णालयातील ही स्थिती केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचे प्रतिबिंब आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित बाबींमध्ये अशी निष्काळजीपणा परवडणारा नाही.आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.






