मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भुजबळ यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत फडणवीसांवर मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री बनवले आहेत. भुजबळांना पुढे आणून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध डाव रचत आहेत,” असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
“असे कोणते संकट होते की भुजबळ यांना पुन्हा मंत्री करावे लागले? हा निर्णय म्हणजे फडणवीस यांचा मराठा समाजावरील द्वेषच आहे,” असे सांगत जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस ओबीसी आणि मराठा समाजाचा विश्वासघात करत असल्याचे म्हटले.
Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!
मनोज जरांगे यांनी रविवारी पुन्हा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली. “२९ ऑगस्ट रोजी आम्ही मुंबईकडे कूच करू. १२ ते १३ दिवसांचा निषेध होईल. या आंदोलनात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलमधील महाकाळ गावात केलेल्या भाषणात केले. मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून मान्यता देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी आंदोलनकर्ते सातत्याने करत आहेत. “माझी तब्येत बिघडत आहे, पण आरक्षण मिळेपर्यंत मी मरणार नाही. आम्ही रिकाम्या हाताने परतणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी मराठा आंदोलक त्यांनी काल अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गोदाकाठच्या 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “आजपासूनच मुंबईत जाण्याची तयारी सुरू करा.”
या बैठकीत बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “फडणवीस ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतरवाली सराटी येथील घटनेमागेही त्यांचा हात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील सहआरोपी फडणवीस यांच्यामुळे अटक टळली. कुणबी नोंदी मिळालेल्या लोकांना वैध प्रमाणपत्र मिळू नये यासाठी अधिकारी त्रुटी दाखवत आहेत, आणि ही प्रक्रिया मुद्दाम अडवली जात आहे.”
कशी सुरु झाली परंपरा ‘Redhead Day’ साजरा करण्याची? वाचा यामागची रंजक कहाणी
जरांगे पुढे म्हणाले, “जर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. फडणवीस यांना शेवटचा इशारा देतो, माजात आणि मस्तीत वागणं थांबवा, नाहीतर समाज शांत बसणार नाही. काही मंत्री आणि अधिकारी सांगत आहेत की, फडणवीस गुप्त डाव आखत आहेत. त्यामुळे आम्हालाही आता त्यांना जशास तसे उत्तर द्यावे लागेल.”
ते पुढे म्हणाले, “मी आता मुंबईत विजयाचा गुलाल घेऊनच जाणार. मी कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझ्या विरोधात खोटं नाटक करून बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पण गरज पडल्यास जीव गेला तरी चालेल, मी समाजाशी गद्दारी करणार नाही. त्यांनी सत्ता टिकवायची आहे, तर मला समाजाची बाजू घ्यायची आहे. मी कोणाकडून पद किंवा पैसा घेतलेला नाही – फक्त तुमच्या मुलाबाळांसाठी दुश्मनी घेतली आहे. मी अनेकदा उपोषण केले आहे, त्यामुळे शरीरात आजार आणि वेदना आहेत. तरीही, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही.”