Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बारामती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याशिवाय वातावरणात देखील सतत बदल पाहायला मिळत आहे.
“ते तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात…; गिरीश महाजनांनी छगन भुजबळांवर लगावला जोरदार टोला
मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, अशा अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाला आणि मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही, असं होणं कठीणच आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कोलमडली आहे. मुंबई लोकल ट्रेन उशीराने धावत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ठाणे ते कल्याण डाऊन आणि अप मार्गावरील लोकलसेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. शिवाय कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. शिवाय रस्त्यावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक देखील उशीराने सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. आय हॉस्पिटल (ग्रँट रोड), मेमनवाडा अग्निशमन केंद्र, सी वॉर्ड कार्यालय, कोलाबा अग्निशमन केंद्र, बी वॉर्ड कार्यालय, मांडवी अग्निशमन केंद्र, भायखळा अग्निशमन केंद्र, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर, नायर हॉस्पिटल, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. मुंबईसह नवी मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरु आहे. मध्य आणि पश्चिम मार्गवरील लोकलसेवेप्रमाणेच हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव , मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात सध्या मागील काही तासांपासून रिपरिप पाऊस सुरू आहे.
मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुढील दोन तास मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. काही घरांमध्ये पाणी शिरले असून शासकीय रुग्णालयातही पाणी साचले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे.