बीडमध्ये अचानक अवकाशातून पडले दगड! गूढ उकलण्याचा प्रयत्न, प्रशासन आणि शास्त्रज्ञ एकत्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बीड : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या खळवट लिमगाव येथे सोमवारी दुपारच्या सुमारास दुर्मिळ खगोलीय घटना घडली. आकाशातून मोठ्या आवाजासह दोन ते चार दगड कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन व शास्त्रज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
घटनेचा थरार: मोठा आवाज आणि आकाशातून कोसळलेले दगड
सोमवारी दुपारी साधारण दोनच्या सुमारास, आकाशात अचानक तीन मोठे आवाज ऐकू आले. त्यानंतर काही क्षणांतच काही दगड आकाशातून खाली पडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यातील एक दगड गावातील भिकाजी अंबुरे यांच्या घरावर कोसळला. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा भेदून तो थेट घरात पडला. त्याचबरोबर आणखी दोन दगड शेतामध्ये कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या आवाजामुळे आसपासच्या गावांतील नागरिकही भयभीत झाले आहेत. हा आवाज कशामुळे झाला आणि हे दगड नक्की कुठून पडले, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, पडलेला दगड अत्यंत थंड असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा : Doomsday Clock : जग मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर! अणुशास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जगाच्या अंताचे घड्याळ केले सेट
प्रशासन आणि शास्त्रज्ञ घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आकाशातून पडलेले दगड ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील एक दगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम खगोल व अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासक श्रीनिवास औंधकर आणि अभिनव विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने घटनास्थळी पाहणी केली. हा आवाज कशामुळे झाला? दगड पडण्यामागचे कारण काय? ही घटना उल्कापाताची आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा संध्याकाळी अशाच प्रकारे दगड पडण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. अनेकांना हा एखादा अपसुख मानला जातो की ही नैसर्गिक खगोलीय घटना आहे, याबाबत संभ्रम आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या तपासणीनंतरच या घटनेमागील खर कारण स्पष्ट होईल.
उल्कापात की अन्य काही?
विशेषज्ञांच्या मते, जर हे दगड उल्कापातामुळे पडले असतील, तर ही अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना ठरेल. उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर ती जळून नष्ट होते, परंतु काही वेळा तिचे अवशेष जमिनीवर पडतात. असे अवशेष सामान्यत: वेगळ्या रचनेचे, वजनाने जड आणि चुंबकीय असतात. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल.
प्रशासनाच्या सतर्कतेने नागरिकांना दिलासा
तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे. संबंधित घटनेचा अभ्यास करून तज्ज्ञ लवकरच अहवाल सादर करणार आहेत.
हे देखील वाचा : Women’s Day 2025 : ‘विज्ञानातील स्त्रीशक्ती’ ज्यांनी इतिहास घडवला पण त्यांचे शोध मात्र झाले इतिहासजमा, पुरुषांना मिळाले श्रेय
दुर्मिळ खगोलीय घटना
बीड जिल्ह्यात घडलेली ही घटना एक दुर्मिळ खगोलीय घटना असू शकते. प्रशासन आणि शास्त्रज्ञ या घटनेचा सखोल अभ्यास करत आहेत. यामुळे भविष्यात अशी घटना पुन्हा होण्याची शक्यता आणि त्याचे संभाव्य परिणाम यांचा शोध घेतला जाईल. दरम्यान, ग्रामस्थांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.