सौजन्य - सोशल मिडीया
इचलकरंजी : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची अत्यंत दूरवस्था झाली असून, दोन्ही बाजूकडील कॉर्नर अत्यंत धोकादायक बनले आहेत. रांगोळीकडून आलेल्या ट्रक चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने ताबा सुटून ट्रक पुलाजवळच पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी जुन्या व नव्या पुलाच्या दोन्ही बाजूकडेला सुरक्षा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
रांगोळीकडून आलेला रिकामा ट्रक आला. परंतु वळणावर ट्रकचालकास पूलालगतच कॉर्नरला निर्माण झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला व ट्रक रस्ता ओलांडून पुलाच्या दुसऱ्या बाजूस जाऊन खड्ड्यात पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु प्रशासनाने वेळीच या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. जुन्या पुलावरील संरक्षक लोखंडी पाईप अनेक ठिकाणी निखळल्या असून, हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. तर दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूस कॉर्नरचे रस्ते धोकादायक बनत आहेत. शिरदवाडकडून येताना नवीन पुलाच्या सुरुवातीला दोन्ही बाजू अत्यंत धोकादायक झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : कारखानदारांना कर वसुलीच्या नोटिसा; ‘या’ कारखान्यांकडे काेट्यावधी रुपये थकीत
उपाययोजना करण्याची गरज
काही दिवसांपूर्वी अंकली पुलावर झालेल्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण जुन्या पुलावर व दोन्ही पूलांच्या दोन्ही बाजूकडे संरक्षणाच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना काहीच कामाच्या ठरणार नाहीत.
अपघाताचे प्रमाण वाढले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोने तिघांना उडविले
गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला महिला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.