सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना पुलाची शिरोली ग्रामपंचायतीने सुमारे सव्वा कोटी रुपयांची तर टोप ग्रामपंचायतीकडून सुमारे ऐंशी लाख रुपयांची थकीत कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे उद्योजकांत एकच खळबळ उडाली आहे.
शिरोली औद्योगिक वसाहतीत पुलाची शिरोली, टोप व शिये ग्रामपंचायतीचा समावेश होतो. या ग्रामपंचायती आप आपल्या हद्दीतील कारखान्याची कर वसुली करत असतात. पण अनेक कारखानदारांनी कित्येक वर्षे संपूर्ण कर भरलेला नाही. त्यामुळे ही थकबाकी कोटींच्या घरात गेली आहे. या थकबाकी वसुलीसाठी व आकारणी मध्ये तडजोड करण्यासाठी लोकप्रतिनिधी व उद्योजक प्रतिनिधी यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या, परंतु त्यामधून कोणताही तडजोडीचा मार्ग निघू शकला नाही. अखेर संबंधित ग्रामपंचायतींनी थकबाकी वसुलीसाठी लोकन्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडून थकबाकीदार कारखानदारांना युद्धपातळीवर शुक्रवार सकाळपासून नोटीसा लागू करण्याची मोहीम राबविण्यात आली. या नोटीसा मिळताच उद्योजकांत हालचाली सुरू झाल्या. याबाबत सायंकाळी चार वाजता स्मॅक भवनमध्ये बैठक झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
दरम्यान याबाबत नोटीस धारकांना पेठवडगाव येथील लोक न्यायालयात हजर राहून खुलासा द्यावा लागणार आहे. यामुळे उद्योजकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रक्कम जमा करण्याचा आदेश लागू
महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षांपासून औद्योगिक वसाहतीतील कारखाना व मोकळ्या जागेचा करफळा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर वसुली नोटीस ग्रामपंचायतीने लागू करायची व वसुली औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा करायची, असा अधिकृत नियम केला आहे. जमा झालेल्या रक्कमेपैकी पन्नास टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीकडे औद्योगिक विकास महामंडळाने वर्ग करायची आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद फ्लॅट फोडून तब्बल लाखोंचा ऐवज लंपास
खुलासा सादर करण्याची सूचना
ज्या कारखानदारांकडे कराची थकीत रक्कम आहे. त्यांना वसुलीच्या नोटिसा शुक्रवारी शिरोली औद्योगिक वसाहतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लागू केल्या आहेत. शनिवारी सकाळी अकरा वाजता पेठवडगाव येथील लोक न्यायालयाच्या विधी व न्याय विभागात हजर राहून खुलासा सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पुलाची शिरोली ग्रामपंचायतीकडे सुमारे १२० थकबाकीदार आहेत. तर टोप ग्रामपंचायतीकडे सुमारे १३५ थकबाकीदार आहेत. या नोटीसामुळे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत असून, थकबाकी वसुली नोटीसीबाबत न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.
शिरोली ग्रामपंचायतीने नोटिसा लागू करण्यापूर्वी उद्योजकांच्या बरोबर चर्चा करणे अपेक्षित होते. कारण ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची औद्योगिक वसाहतीत सेवा सुविधा देत नाही. तरीही कर भरण्यास आतपर्यंत कोणीही विरोध केलेला नाही. पण उद्योजकांच्या न्यायासाठी योग्य मार्गाने लढा देणार आहे.
-राजू पाटील (अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर)
ग्रामपंचायतीने कर भरण्यासंदर्भात वारंवार वसुली नोटीस लागू करण्यात आल्या होत्या, परंतु अनेक कारखाना मालकांनी कर (फाळा) न भरता थकबाकी राखली आहे. अशा थकबाकीदार व्यक्तींना शासन नियमाप्रमाणे नोटिसा लागू केल्या आहेत. वसुलीबाबत आपण समन्वयाची भूमिका घेतली होती, परंतु उद्योजक प्रतिनिधींनी तडजोडीची भुमिका घेतली नाही.
– ए. वाय. कदम (ग्रामपंचायत अधिकारी)
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कर वसुली ही गेली अनेक वर्षे थकीत राहिली आहे. कारखानदारांनी आपली कागदोपत्री अडचण दूर करण्यासाठी तात्पुरता कर भरून ती पूर्ण करुन घेतली आहे. पण संपूर्ण कर भरण्यास त्यांनी असमर्थता दाखविली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कारखानदार तसेच ग्रामस्थांच्याकडील थकीत कर वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यास सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
– पद्मजा करपे (सरपंच ग्रामपंचायत पुलाची शिरोली)