फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार प्रय्तन सुरु केले आहेत. तर बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबच तिसरी आघाडी करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याचबरोबर आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील राजकारणामध्ये येण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक जोरदार गाजणार हे नक्की आहे. यामध्ये आता महायुती व महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिंदे गटाच्या आमदारांनेच सडेतोड उत्तर दिले आहे.
राज्यामध्ये लवकरच निवडणूक असल्यामुळे महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री कोण असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या जागावाटपाची चर्चा असताना यावर अजित पवार यांनी मत व्यक्त केले. मुख्यमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या महायुतीचं आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये बहुमत गाठण्याचा प्रयत्न आहे. त्याकडे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत निवडणूकीनंतर निर्णय घेतला जाईल, असे विधान अजित पवार यांनी केले. त्यामुळे बहुमत आले तरी महायुतीचे मुख्यमंत्री शिंदेच असतील असे नाही, असे अप्रत्यक्षपणे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावर शिंदे गटाच्या आमदारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
पुढेही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री
माजी मंत्री आणि शिंदेसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विधानानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली. विजय शिवतारे म्हणाले की, 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत. कदाचित पुढेही दोन-तीन वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील. महायुतीत अजिबात खदखद नाही, कधी कधी काही लोकं वैयक्तिक बोलतात. शंभर नेते आहेत, त्यातील काही लोक चुकीचं बोलतात. महायुतीत वाद निर्माण करणारी विधानं करण्यात आली नाही पाहिजे. जनमाणसात आताही आणि पुढेही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार अशी चर्चा आहे. लोकांना धडपड करणारा व्यक्ती हवा असून शिंदे हे महाराष्ट्राला मिळालेलं वरदान आहे. असाच माणूस महाराष्ट्राला हवा आहे, असे विधान विजय शिवतारे यांनी केले. त्यांनी अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
भाजपाचा आमदार म्हणणं बालिशपणा
पुढे विजय शिवतारे यांनी पुरंदर जागेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघे मिळून ठरवतील त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. केंद्रात भाजप सरकार आहे म्हणून विधानसभा मतदारसंघावर दावा करत भाजपाचा आमदार म्हणणं बालिशपणा आहे. शिंदे जे ठरवतील तो निर्णय मान्य असेल असंही शिवतारे यांनी सांगितले.
महायुतीकडे तिन्हीही नेते
सध्या राज्यामध्ये महायुतीचे राज्य आहे. महायुतीचे सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे भाजप नेते व कार्यकर्ते यांची फडणवीसांच्या नावाला पसंती आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा याआधी बोलून दाखवली आहे. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करायचे आहे. त्यामुळे यंदा महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद कळीचा मुद्दा ठरणार आहे.